मुक्तपीठ टीम
आज जळगावमधील वसतिगृह अत्याचार प्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज पुन्हा आघाडी सरकारविरोधात आक्रमकतेने चढाई केली. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधात असो की वनमंत्री संजय राठोड…दरवेळी सरकारविरोधात जर भाजपामधून कुणी आक्रमकतेने आघाडीवर असते तर त्या चित्रा वाघच. पण भाजपच्या महिला मोर्चा मात्र या सर्व प्रकरणांमध्ये वाघांच्या डरकाळ्यांशी तुलना करता महिला मोर्चाचा आवाज खूपच क्षीण वाटत असल्याची चर्चा भाजपाच्या वर्तुळात रंगील आहे. त्यामुळे भविष्यात भाजपाच्या महिला नेतृत्वात काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
त्रास होऊनही चित्रा वाघ आक्रमकच!
विधानसभा निवडणुकीपूर्वी चित्रा वाघांनी राष्ट्रावादीची साथ सोडून भाजपात प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी तो प्रवेश त्यांचे पती किशोर वाघ यांना लाचलुचपत खात्याच्या कारवाईपासून वाचवण्यासाठी केल्याची चर्चा रंगली होती. अगदी शरद पवारांनीही चित्रा वाघांनी मला भेटून “स्वत:च्या संस्थेच्या दोन फाइल लाचलुचपत विभागाकडे गेल्या आहेत. त्यांचे पती किशोर वाघ यांच्यावरही लाचलुचपत विभागानं गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे मी जात आहे.” असे कारण सांगितले असे उघड केले होते. प्रत्यक्षात भाजपात गेल्यानंतरही किशोर वाघांविरोधातील फाइल भाजपाची सत्ता गेली तरी तशीच ठेवली गेली असावी. त्याचाच फायदा आता त्यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्तेचा गुन्हा नोंदवताना सध्याच्या सत्ताधाऱ्यांना झाला. मात्र, हे सारं झालं तरी चित्रा वाघांनी मात्र भाजपात आल्यापासून आपली आक्रमकता तसूभरही कमी केली नाही. उलट आघाडी सत्तेवर आल्यापासून प्रत्येक अत्याचारांच्यावेळी त्या तडफेनं उभ्या राहिल्या.
चित्रा वाघांची डरकाळीच जास्त घुमते!
विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा प्रत्येक ठिकाणी त्यांनी अत्याचारांविरोधात धाव घेत आवाज उठवल्याने त्यांचे नाव सातत्यानं चर्चेत राहिलं. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्याविरोधातील अत्याचार प्रकरणातही त्यांनीच लढा दिला. त्यानंतर पूजा चव्हाण प्रकरणही त्यांनीच आक्रमकतेने पुढे नेले. भाजपाचे अनेक नेते संजय राठोडांचं थेट नाव घेण्यास कचरत असताना चित्रा वाघांनी त्यांच्यावर आक्रमकतेने हल्लाबोल केला. महिला मोर्चाच्या राज्य अध्यक्षा उमा वाघ आणि इतर पदाधिकारी यांनी केलेली आंदोलनं ही चित्रा वाघांच्या आक्रमकतेमुळे झाकोळून गेली. मुळात ती आंदोलनं थातूरमातूरच होती, असं मत भाजपाच्या एका नेत्यानं व्यक्त केलं. स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राठोडांच्या राजीनाम्याचे श्रेय देता महिला मोर्चा आणि चित्रा वाघ असा खास उल्लेख केल्याचीही त्या नेत्याने आठवण करून दिली.
खापरेंच्या मर्यादा
सध्या पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेविका उमा खापरे या भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडे गटाच्या मानल्या जाणाऱ्या उमा खापरे भाजपात जुन्या असल्या तरी सध्याच्या राजकीय रणनीतीत त्या तेवढ्याशा कुशल नसल्याने महिला अत्याचारांच्या प्रकरणांमध्ये महिला मोर्चा तळपताना दिसत नाही. उलट नव्या असूनही आमच्या चित्रा वाघांचीच डरकाळी जास्त घुमते, असं मत मुंबईतील एका भाजप महिला नेत्याने व्यक्त केले.
जुन्या नेत्या बाजूला
महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष विजया रहाटकर, माधवी नाईक यांच्यासारख्या जुन्या भाजपा महिला नेत्याही आता काहीशा बाजूला पडल्या आहेत. रहाटकर राष्ट्रीय राजकारणात गेल्यापासून राज्याच्या चर्चेत नसतात.