मुक्तपीठ टीम
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या पाच साथीदारांना डी कंपनीशी संबंधित मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. एका मालमत्तेच्या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, सब-रजिस्ट्रारसह आरोपींनी बनावट कागदपत्रे तयार करून पीडितेची फसवणूक करण्याचा गुन्हेगारी कट रचला. तक्रारदाराची २५ कोटी रुपयांची मालमत्ता हडप करण्याचा त्यांचा हेतू होता. दाऊद इब्राहिमवर १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात सहभाग असल्याचा आरोप आहे.
बनावट कागदपत्रांद्वारे २५ कोटींची मालमत्ता हडपण्याचा कट!
- बनावट कागदपत्रांद्वारे २५ कोटी रुपयांची मालमत्ता बळकावल्याचा आरोप करत तक्रारदाराने या पाच आरोपींविरुद्ध मुंबई गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती.
- त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने पाच जणांना अटक केली.
- मुस्लिम असगर अली उमरेवाला, शेरजादा जांगरेज खान, अस्लम अब्दुल रहमान पटनी, रिझवान अलाउद्दीन शेख आणि सलीम फ्रूट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
- आरोपींना चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
सर्व आरोपींविरुद्ध आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट यालाही अटक केली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. क्राईम ब्रँचने सलीम फ्रुटला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून ताब्यात घेतले होते. पाचही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले.