मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानानंतर ते एकाकी पडले आहेत. विरोधी पक्षांच्या जोरदार विरोधानंतर, आता भाजपानेही कोश्यारींचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. आज भाजपाचे उदयनराजे भोसलेही आक्रमक झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संताप व्यक्त केला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापत चाललं आहे. राज्यपालांचा निषेध करत त्यांना पदमुक्त करण्यासाठी जागोजागी आंदोलनं केली जात आहेत. खासदार उदयनराजे भोसलेंनी राज्यपालांनी केलेल्या विधानावरुन त्यांना चांगलंच सुनावलं आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत, महाराजांच्या अपमानाचा राग कसा येत नाही, महाराजांबाबत बेगडी प्रेम का दाखवता, असा सवालही त्यांनी राजकारण्यांना आणि राजकीय पक्षांना विचारला आहे.
पत्रकार परिषद घेऊन उदयनराजे भोसले काय म्हणाले?
- तुम्हाला काहीच वाटत नसेल तर शिवाजी महाराजांची जंयती साजरी का करायची?
- महाराजांचे पुतळे कशाला उभारायचे?
- विमानतळाला महाराजांचं नाव कशाला घ्यायचं. मला हे असं बोलताना वेदना होत आहेत.
- जर तुम्हाला महाराजांचा सन्मान ठेवता येत नसेल, तर त्यांचं नाव घेण्याचंही हक्क तुम्हाला नाही.
- शिवाजी महाराजांनी आपल्या देशाला लोकशाही आणि सर्वधर्मसमभावाचा विचार दिला. पण आज ठिकठिकाणी केवळ स्वार्थापोटी शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर सुरु आहे.
- आम्ही त्यांच्या मार्गावर आणि आदर्शावर चालत आहोत, असे सर्वजण म्हणतात. मग शिवाजी महाराजांविषयी इतक्या विकृत पातळीवर जाऊन वक्तव्य होत असताना, त्यांची अवहेलना होत असताना, कोणालाच चीड कशी येत नाही?
- सर्व राजकीय पक्षांचा अजेंडा वेगवेगळा असला तरी त्यांचा मुलभूत विचार हा शिवाजी महाराजांच्या आदर्शांना अनुसरून आहे. मग हे सर्वजण छत्रपतींचा अपमान होत असताना एकत्र येऊ आवाज का उठवत नाहीत, असे उदयनराजे भोसले यांनी प्रश्न उपस्थित केले.
३ डिसेंबरला रायगडावर आक्रोश करण्याचा इशारा!
उदयनराजे भोसले म्हणाले की, “मी येत्या ३ डिसेंबरला महाराजांची समाधी असलेल्या रायगडावर जाणार आहे. आपण सर्वांनी यावे. महाराजांचा अपमान झाला आहे त्याबद्दल प्रतिकात्मक आक्रोश व्यक्त करणार आहे.” असेही ते म्हणाले.