हेरंब कुलकर्णी
‘नवसे कन्या पुत्र होती /मग का करणे लागे पती ‘ इतक्या धारदार शब्दात ज्या तुकारामांनी नवस कल्पनेचा फोलपणा दाखवला, जिथे गाडगेबाबांनी त्यातील लूट मूर्खपणा उघड करत गरीबांचे प्रबोधन केले त्याच महाराष्ट्र राज्याचे घटनात्मक प्रमुख असलेले मुख्यमंत्री, आमदारांचा गोतावळा घेऊन नवस फेडायला जात आहेत. तुकाराम महाराजांनी केलेले प्रबोधन संतांचे नाव धारण केलेले मुख्यमंत्री आज उलटे फिरवत आहे हे जास्त वेदनादायक आहे.
अशावेळी हमखास व्यक्तिस्वातंत्र्य , व्यक्तिगत श्रद्धा, सुनावले जाईल पण घटनेची शपथ घेतलेल्या,घटनेतील विवेक,वैज्ञानिकता यावर निष्ठा व्यक्त केलेल्या व्यक्तीने श्रद्धा जपणे वेगळे व अंधश्रद्धा पाया असलेल्या नवस सारख्या गोष्टी वाजतगाजत तशीच शपथ घेतलेल्या लोकप्रतिनिधीना सोबत नेऊन करणे यातील फरक लक्षात घ्यायला हवा..
यातील राजकारण व टीका वगळून सामाजिक परिणामाचा विचार करायला हवा.समाजातील सामान्य माणसांवर लोकप्रतिनिधी,प्रसिद्ध माणसे यांच्या वागण्याचा परिणाम होत असतो.ते त्याचे अनुकरण करतात व हे लोक जे करतात त्याला एक अधिमान्यता मिळते त्यामुळे लोकप्रतिनिधी व नेत्यांनी खूप जपून वर्तन करायला हवे..आज मुख्यमंत्री यांनी नवस केल्यामुळे गरीब वर्ग नवस करण्यात अधिक बळी जाईल.. एका एका नवसात गरीब अक्षरशः कर्जबाजारी झाले आहेत. गरिबांना नवसाकडे अधिक ढकलले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेत्यांना व्यक्तिगत आयुष्य असले तरी असल्या व्यक्तिगत अंधश्रद्धा गाजावाजा न करता पाळायला हव्यात..
मुख्यमंत्री निवासस्थानी सत्यसाई बाबा बोलावले म्हणून ज्या महाराष्ट्रात प्रचंड टीका झाली होती त्या महाराष्ट्रात आज मात्र या विषयावर सन्नाटा आहे…
हेरंब कुलकर्णी
8208589195
(हेरंब कुलकर्णी हे शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत. कोरोना काळात अनाथ झालेली मुलं, वैधव्य आलेल्या महिलांसाठीही ते कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक म्हणून सातत्यानं कार्यरत आहेत.)