मुक्तपीठ टीम
राष्ट्रपती भवन आणि राष्ट्रपती भवन संग्रहालय १ डिसेंबरपासून आठवड्यातील पाच दिवस सर्वसामान्यांसाठी खुले राहणार आहे. कोरोना काळात एप्रिल २०२०मध्ये ते बंद करण्यात आलेले. राष्ट्रपतींच्या सचिवालयाने माहिती दिली की “राष्ट्रपती भवन दौरा बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या पाच दिवसांच्या स्लॉटमध्ये उपलब्ध असेल. राष्ट्रपती भवन दौऱ्याव्यतिरिक्त, लोक आठवड्यातून ६ दिवस म्हणजेच मंगळवार ते रविवार या दिवसांत राष्ट्रपती भवन संग्रहालयालाही भेट देऊ शकतील.
दर शनिवारी मिळणार चेंज ऑफ गार्ड सोहळा पाहण्याची संधी!
- सकाळी ८ ते ९ या वेळेत राष्ट्रपती भवनाच्या आवारात चेंज ऑफ गार्ड सोहळा पाहता येईल, असे राष्ट्रपती सचिवालयाकडून सांगण्यात आले.
- तसेच, राजपत्रित सुट्टीच्या दिवशी किंवा राष्ट्रपती भवनाकडून सार्वजनिक हालचाली बंद करण्याबाबत अधिसूचना आल्यावर शनिवारी हा कार्यक्रम होणार नाही.
राष्ट्रपती भवन दौऱ्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि नोंदणी शुल्क…
- राष्ट्रपतींच्या सचिवालयाकडून सांगण्यात आले आहे की, भारतीय नागरिकांनी राष्ट्रपती भवनाला भेट देताना कोणतेही वैध फोटो ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे.
- परदेशी नागरिकांनी त्यांचा मूळ पासपोर्ट बाळगणे आवश्यक आहे.
- राष्ट्रपती भवन दौऱ्यासाठी, ५० रुपये शुल्क भरून नोंदणी करावी लागेल, ज्यामध्ये आठ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी नोंदणी शुल्कात सूट दिली जाईल.
- भारताव्यतिरिक्त परदेशी नागरिकही राष्ट्रपती भवनाला भेट देऊ शकतात.
- परदेशी नागरिकांसाठी नोंदणी शुल्क जास्त असेल, ज्याची माहिती वेबसाइटवरून मिळू शकेल.
राष्ट्रपती भवनासाठी या http://rashtrapatisachivalaya.gov.in/rbtour अधिकृत लिंकवरून ऑनलाइन नोंदणी देखील करू शकता . या वेबसाइटवर राष्ट्रपती भवन, राष्ट्रपती भवन संग्रहालय टूर आणि चेंज ऑफ गार्ड सोहळ्यासाठी ऑनलाइन बुकिंग करता येईल.