मुक्तपीठ टीम
मंगळवारी सकाळी भारत जोडो यात्रेने हिंगोली जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात मोठ्या धुमडाक्यात प्रवेश केला. वाशीमच्या वेशीवर लाल किल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. ढोल ताशाचा गजर, वाशीम जिल्ह्यातील आदिवासी समाजाचे पारंपरिक नृत्य, तसेच हिंगोली, वाशिम, यवतमाळ, अमरावती जिल्ह्यांसह सांगलीतुन आलेली हजारोंची गर्दी, असे भव्य स्वागत यावेळी करण्यात आले. या यात्रेने संपूर्ण वाशीम जिल्ह्यात चैतन्य पसरले होते.
भारत जोडो यात्रेची सुरवात मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास फळेगाव येथून ढोल ताशाच्या गजरात आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झाली. दहा वाजता अंजनखेड येथे विश्रांतीसाठी थांबली. संध्याकाळी अंजनखेड येथून सुरू होऊन यात्रा वाशीम शहरात दाखल होईल. स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आदिवासी नृत्यकला अनेक ठिकाणी सादर केली होती. त्यामध्ये आदिवासी संस्कृती, दंडार, ढोलताशे, भेमसा नृत्य याचा समावेश होता.
सकाळच्या सत्रात राहुलजींच्या सोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, डॉ. विश्वजीत कदम, प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे, आ. डॉ. प्रज्ञा सातव उपस्थित होते.
रस्त्याच्या बाजूला उभ्या खेड्यातील लहान मुलांमुलींचा एक समूह पाहताच राहुजींनी जवळ बोलावले. त्यांना चॉकलेट देत त्यांच्याशी संवाद साधला तर रस्त्यावर उभ्या असलेल्या ग्रामीण महिलांचा समूहही त्यांना भेटला. वृद्ध महिलांनी त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवून आपल्या डोक्याला कडाकड बोटे मोडत दृष्ट काढली. मग त्यांना आपुलकीने मिठी मारली आणि आशीर्वाद देऊन सुरक्षा कड्यातून बाहेर आल्या. एकेठिकाणी तुर पिकाची झाडे हातात घेवून शेतकरी बैलगडीसह राहुल गांधींना भेटायला आले होते. शेतकऱ्यांचे जीवन किती कष्टाने भरलेले आहे, हे सांगण्यासाठी आम्ही बैलगाडीसह आल्याचे त्यांनी सांगितले.