मुक्तपीठ टीम
काश्मिरमध्ये दहशतवादी संघटनांनी आता पत्रकारांनाही लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. काश्मीर फाइट या दहशतवादी संघटनेने काश्मीरमधील पत्रकारांची हिटलिस्ट जारी केली आहे. दहशतवाद्यांकडून इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रीय पत्रकारिता दिनाच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यम संघटनांनी या प्रकाराला पत्रकारांवरील हल्ल्याचे षड्यंत्र ठरवून हा काळा दिवस म्हटले आहे. पत्रकारांवरील दहशतवादी धमक्यांमुळे एकाच मीडिया हाऊसच्या पाच पत्रकारांनी एकत्र राजीनामा दिला आहे.
दहशतवाद्यांनी जारी केली पत्रकारांची हिट लिस्ट!
- मंगळवारी काश्मीर फाइट या दहशतवादी संघटनेने सोशल मीडियावर डझनभर पत्रकारांची हिटलिस्ट जारी केली.
- यामध्ये पत्रकारांच्या नावापुढे त्यांना धमक्या का दिल्या जात आहेत, हे सांगण्यात आले.
- जम्मू आणि श्रीनगरमधील पत्रकारांकडून अशा धमकावण्याचा निषेध केला जात आहे.
- अशा धमक्या म्हणजे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर थेट हल्ला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
काही पत्रकारांनी दिला राजीनामा!!
- या धमकीनंतर काश्मीरमधील पत्रकारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
- आता ते घराबाहेर पडायला घाबरत आहेत.
- अनेकांनी कामावर जाण्यासही नकार दिला आहे.
- यामुळे संपूर्ण मीडिया जगतात खळबळ उडाली आहे.
- श्रीनगरच्या प्रेस कॉलनीतही सामान्य दिवसांपेक्षा कमी पत्रकार दिसले.
- संध्याकाळ झाली तरी ऑफिसमधून घरी जाण्याची घाई होती.
- दहशतवाद्यांच्या धमकीला घाबरून श्रीनगरमधील स्थानिक वृत्तपत्रात काम करणाऱ्या काही पत्रकारांनी फेसबुकवर राजीनामे दिले आहेत तर काही जम्मूला गेले आहेत.