मुक्तपीठ टीम
“मानवतावाद हा पत्रकारितेचा गाभा असायला हवा. मात्र, आज बाजारीकरण, उथळपणाला अधिक महत्व दिले जात आहे. परिणामी, माध्यमांवरची विश्वासाहर्ता कमी होत आहे. सामान्य माणसाचा, दुःखितांचा, कष्टकऱ्यांचा कळवळा माध्यमांना असला पाहिजे. माणूसकेंद्री, सकारात्मक व आश्वासक पत्रकारितेची गरज आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व लेखक विजय कुवळेकर यांनी केले.
मनोविकास प्रकाशनातर्फे ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार महावीरभाई जोंधळे यांच्या ‘गवतात उगवलेली अक्षरं’ या आत्मकहाणीचे प्रकाशन कुवळेकर यांच्या हस्ते झाले. टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदमजी हॉलमध्ये आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार व लेखक अरविंद गोखले, पत्रकार विजय चोरमारे, मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर, सौ. इंदुमती जोंधळे उपस्थित होते.
विजय कुवळेकर म्हणाले, “पत्रकार हा लेखक असायला हवा. ललितलेखनाची गोडी असेल, तर चाकोरीबाहेरचे विषय आपल्याला मांडता येतात. पुरोगामी-प्रतिगामी असा शिक्का मारून माणूस कधीच समजत नाही. विचारांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. नैतिकता जपत निर्मोही व लोकानुरंजनाची पत्रकारिता व्हावी. लढवय्यी वृत्ती न सोडता नव्यातील चांगले टिपून त्याचा समाजहितासाठी उपयोग कसा करता येईल, याचा विचार पत्रकार, लेखकांनी करायला हवा.”
महावीर जोंधळे म्हणाले, “वेगवेगळ्या विचारांच्या लोकांचा संवाद महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र फिरताना, अबाल वृद्धांशी बोलताना प्रेम वाटण्याची गरज आहे. द्वेषाचे राजकारण, जातीधर्मातील भेदाभेद यामुळे समाजात विभागणी झाली आहे. द्वेष, शत्रुत्व, मत्सर घालवण्यासाठी प्रेम, वात्सल्याची भावना निर्माण करण्याची गरज वाटते. पत्रकाराकडे विचार असला पाहिजे. जनसामान्यांच्या प्रश्नाचा आरसा म्हणून पत्रकारांनी काम करावे. तुच्छतावादाच्या पलीकडे जाऊन काम केले पाहिजे. व्हॉट्सअप विद्यापीठाच्या जमान्यात आपण जबाबदारीचे भान राखले पाहिजे.”
विजय चोरमारे म्हणाले, “पत्रकारितेला भांडवली स्वरूप प्राप्त झाले आहे. तत्वनिष्ठ पत्रकारिता संग्रहालयात ठेवावी, अशी आजची स्थिती आहे. अलीकडच्या काळात बाजारव्यवस्थेशी तडजोड करून काम करण्याची वेळ संपादकांवर आली आहे. माध्यमे प्रबोधनाचे काम करतात की मार्केटिंगचे हेच कळत नाही. आज वार्तामूल्य हरवलेल्या काळात छोटी माणसे मोठी करून दाखवली जातात. पत्रकारितेतील उपक्रमशीलतेचे बाजारीकरण दुर्दैवी आहे. जोंधळे यांच्या पुस्तकातून पत्रकारितेचा इतिहास गुणदोषांसाहित अधोरेखित झाला आहे.”
अरविंद गोखले म्हणाले, “पत्रकारितेला ‘गिव्ह अँड टेक’ची सवय लागली आहे. स्पष्टपणे लिहिणाऱ्या पत्रकारांची वानवा आहे. समाजाच्या हितासाठी चांगले आणि स्पष्ट लिहिण्याची गरज आहे. कटुता येण्याच्या भीतीने अनेकजण लिहिण्याचे टाळतात.”
अरविंद पाटकर यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. आसावरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.