मुक्तपीठ टीम
शिवसेनेतील बंडानंतर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ५० खोके एकदम ओके अशा घोषणा देत शिंदे गटाच्या आमदारांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. ५० खोक्यांवरून सुरु झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात यावरुनच वाद निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते विजय शिवतारे यांनी प्रसारमाध्यमांसमोर पक्षाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप करणाऱ्यांविरोधात २ हजार ५०० कोटींचा मानहानीचा खटला दाखल केला जाणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांनाही इशारा दिला.
५० खोक्यांचा आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा ठोकणार…
- खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिला आहे.
- विरोधकांच्या आरोपांना त्यांच्याच भाषेत उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या गटाचे नवे प्रवक्ते म्हणून विजय शिवतारे यांची नियुक्ती केली आहे.
- विजय शिवतारे यांनीही जबाबदारी मिळताच कामाला सुरुवात केली आहे.
- यासोबतच आरोप करणाऱ्या नेत्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही त्यांनी ठरवले आहे.
- एकनाथ शिंदे गट आघाडीच्या नेत्यांना २ हजार ५०० कोटींच्या मानहानीच्या नोटिसा पाठवणार आहे.
काय म्हणाले विजय शिवतारे?
- पत्रकार परिषदेला संबोधित करताना विजय शिवतारे यांनी यासंबंधित माहिती दिली.
- राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार आदित्य ठाकरे, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर ५० कोटी घेऊन भाजपाला पाठिंबा दिल्याचा आरोप केला आहे.
- त्यांना मानहानीची कायदेशीर नोटीस पाठवली जाईल. विजय शिवतारे म्हणाले की, एकतर त्यांनी न्यायालयात आरोप सिद्ध करावे किंवा त्यांनी माफी मागावी, माफी मागितली नाही, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अडीच हजार कोटींचा मानहानीचा दावा दाखल केला जाईल.
२ हजार ५०० कोटींचा बदनामीचा फॉर्म्युला काय?
- महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गटाच्या आमदारांवर ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता.
- त्यामुळे शिंदे गटाने प्रत्येक आमदाराच्या बदनामीची रक्कम ५० कोटींवर ठेवली आहे.
- अशा स्थितीत या रकमेची एकूण रक्कम २ हजार ५०० कोटी आहे.
- यासंदर्भात आरोप करणाऱ्या नेत्यांना शिंदे गट बुधवारी नोटीस पाठवणार आहे.