मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती. शिवसेना संपर्क प्रमुखांच्या बैठकीत बोलताना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं. सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरे यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिलं आहे. मध्यावधी निवडणुकांच्या अंदाजामागे काय लॉजिक आहे, असा टोला त्यांनी ठाकरेंना लगावला आहे. त्यामुळेच मध्यावधीची हूल की चाहूल खरंच लागत आहे, हे मांडण्याचा प्रयत्न.
मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय?
- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पालघमध्ये आयोजित कोकण महोत्सव कार्यक्रमात बोलत होते.
- आम्हाला निवडणुकांची भीती नाही.
- निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करत नसल्याने आम्हाला त्याची तयारी करण्याची गरज नाही.
- तसंच, मध्यावधी निवडणुकांचं लॉजिक काय? हा संभ्रम का निर्माण करत आहात?
- आपल्याकडील आमदार, लोकप्रतिनिधी सोडून जाता कामा नये यासाठी ते अशी वक्तव्यं करत आहेत.
- आघाडीतील पक्षही शिवसेना आमचा नैसर्गिक मित्रपक्ष नसल्याचं म्हणत आहे.
- काँग्रेसमधील २२ जण भाजपात जाणार, तसंच काही लोक फुटून बाळासाहेबांच्या शिवसेनेत जाणार असल्याचं बोललं जात आहे.
- आपली लोकं थांबवून ठेवण्यासाठी संभ्रम निर्माण करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे.
काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याला प्रकल्प देण्याची घोषणा केली आहे.
- निवडणुका आल्यावरच अशा घोषणा केल्या जातात.
- त्यामुळे केंद्राकडून ही घोषणा करण्यात आली असून याचा अर्थ राज्यात निवडणुका लागू शकतात.
- आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहचला हवं. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा.
- तसेच उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिले.
- राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, त्याला तयार राहा, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
मध्यावधीची हूल की चाहूल?
राजकीय वर्तुळात मध्यावधी निवडणुकांविषयी २ मतप्रवाह आहेत:
मतप्रवाह -१
- एकनाथ शिंदे यांना लाभलेलं मुख्यमंत्रीपद ही थेट दिल्लीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे आशीर्वाद असल्यानेच हे उघड आहे.
- त्यामुळे कमी आमदार असूनही त्यांना ते पद दिलं आहे.
- दिल्लीश्वरांचे आशीर्वाद असल्याने त्यांना धोका नाही, पद कायम तर सत्ता भक्कम आणि मग मध्यावधीची शक्यताच नाही, असं एक मत मांडलं जातं.
मतप्रवाह -२
- दिल्लीश्वरांचे आशीर्वाद असले तरी ते त्यांची गरज भागेपर्यंतच राहतील, ती भागत नाही, असं लक्षात आलं की कृपाछत्रही जाईल, असंही काहींना वाटतं.
- सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने लेखी मुद्दे, युक्तिवाद, संदर्भ प्रकरणे निकाल, पुरावे मागितलेआहेत, याचा अर्थ महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल लवकर लागणं शक्य आहे.
- जर संविधानाच्या १०व्या परिशिष्टातील तरतुदींनुसार न्यायालयानं विचार केला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह १६ बंडखोर आमदारांवर पद गमावण्याचं संकट ओढवू शकतं.
- जर १६ आमदार अपात्र ठरले तरी सत्ता कायम राखण्यासाठी विरोधी पक्षातून देवेंद्र फडणवीसांनी आवश्यक कुमक तयार ठेवल्याची चर्चा आहे.
- पण तशा अस्थिर परिस्थितीत पुन्हा फोडाफोडी करून माथ्यावर कलंक घेण्यापेक्षा, भाजपा नव्याने लोकांपुढे जाण्याचा पर्याय निवडू शकते.
- अर्थात हा पर्याय निवडायचा की नाही, ते गुजरात, हिमाचल प्रदेश या २ राज्यांच्या निकालावर अवलंबून आहे, अशीही चर्चा आहे.