मुक्तपीठ टीम
आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक झाली आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेली धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उचलून धरली आहे. त्यामुळे अधिवेशनात आता मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक राहणार हे स्पष्ट झाले आहे.
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण संजय राठोडांना बाधले. भाजपकडून सातत्याने राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपा आता अधिक आक्रमक होत असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना थेट डिवचलं तेव्हाच स्पष्ट झाले होते.
ठाकरेंसारखे धाडस पवार दाखवणार?
राठोडांच्या राजीनाम्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया भाजपाची पुढील रणनीती अधिक आक्रमक असेल हे स्पष्ट करणारी होती. ते म्हणाले होते, “जे धाडस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवलं आहे… तेच धाडस आता शरद पवार यांनाही धनंजय मुंडे यांच्या मुद्द्यावर दाखवलं पाहिजे.”
ताईंना पाहिजे भाऊंचा राजीनामा
भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला. आज विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी त्यांना समर्थन दिले. त्याचा अर्थ स्पष्ट आहे, भाजपा आता शिवसेनेच्या एका मंत्र्यांची विकेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्यामागे लागणार आहे.