मुक्तपीठ टीम
मुंबई मनपाने नियुक्त केलेल्या कन्सल्टन्सी फर्मने गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत तो बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा हा महत्वपूर्ण पूल पुढील आठवड्यापासून वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. याठिकाणी तब्बल १६० कोटी रुपये खर्च करून चार मार्गिकांचा नवीन पूल बांधण्याची योजना आहे. यासाठी दोन-तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी पर्यायी मार्ग शोधण्याची विनंती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक पोलिसांना केली आहे.
गोखले पूल वाहतुकीसाठी धोकादयक!!
- जुलै २०१८ मध्ये गोखले पुलाचा एक भाग कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळचा हिमालय पूल कोसळून सातजणांचा बळी गेला.
- शहरातील पुलांची सुरक्षितता लक्षात घेऊन मुंबई मनपाने आयआयटी-मुंबईला सर्व पुलांचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते.
- तोपर्यंत गोखले पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी अर्धवट खुला ठेवण्यात आला होता, त्यामुळे परिसरात नाकेबंदी करण्यात आली होती.
- १९७५मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलाला भेगा पडल्याने तो धोकादायक बनला असल्याचे सांगत पाडण्याचा सल्ला देण्यात आला.
पूल पाडण्याचे आणि पुनर्बांधणीचे काम प्रगतीपथावर!!
- सध्या कार्यान्वित असलेल्या गोखले पुलाच्या काही भागाला भेगा पडल्या असून आतील स्टीलही जीर्ण झाले आहे. कन्सल्टन्सी फर्मने सांगितले की हा पूल धोकादायक असून तो वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात यावा.
- पुल विभागाने पोलिस वाहतूक सहआयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हलक्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला असलेला पुलाचा टप्पा २ भाग असुरक्षित आहे. व ते तात्काळ प्रभावाने बंद करावे.
- मेसर्स एसएमएस लिमिटेड या नियुक्त कंत्राटी एजन्सीद्वारे अंधेरी येथील विद्यमान गोखले पूल पाडण्याचे आणि पुनर्बांधणीचे काम प्रगतीपथावर आहे.
- सध्या उत्तरेकडील पुलाचा अर्धा भाग पाडण्यात आला आहे आणि त्याचे बांधकाम सुरू आहे.