मुक्तपीठ टीम
काश्मीरमध्ये या वर्षातील पहिली हिमवृष्टी सुरू होऊन आता दहा दिवस उलटले. एवढ्या लवकर होणारी हिमवृष्टी आणि थंडी पाहता पर्यटकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हिमवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी आता काश्मीरकडे पर्यटकांची रिघ लागत आहे. सोनमर्ग आणि गुलमर्गसह काही लोकप्रिय पर्यटन स्थळांवर हिमवृष्टी आणि पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गुलमर्ग, सोनमर्ग, गुरेझ आणि कर्नाहसह काश्मीरमधील अनेक भागात हिमवृष्टीनं निसर्गाचं शुभ्रसौंदर्य अवतरलं आहे. अनेकांना हे थंडगार शुभ्रसौंदर्य भावतंही.
तसेच, श्रीनगर शहर आणि खोऱ्यातील इतर भागात मुसळधार पाऊस पडत आहे, ज्यामुळे तापमानात काही अंशांनी घट झाली आहे. देशातील अनेक ठिकाणी दिवाळीच्या फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणापासून वाचण्यासाठी येथे आलेल्या पर्यटकांच्या चेहऱ्यांवर सुरुवातीच्या हिमवृष्टीने नक्कीच आनंद फुललाय.
हिमवर्षाव पाहण्यासाठी पर्यटकांची वाढती क्रेझ!
- हिमवृष्टीमुळे यावर्षी काश्मीरमधील हिवाळी पर्यटनात लवकर रस निर्माण झाला आहे.
- हिवाळी पर्यटन टिकून राहण्यासाठी या हिवाळ्यात चांगली हिमवृष्टी होईल, अशी अपेक्षा असल्याचे पर्यटन व्यावसायित सांगतात.
- भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार काश्मीर खोऱ्यात पुढील २ दिवस हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे.
- यावेळी, काही लोक घराबाहेर पडले आणि हिमवृष्टीचा आनंद घेतांना दिसले. तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.
- काश्मीर खोऱ्यात बर्फवृष्टी सुरु आहे. उत्तर भारतात त्यामुळे शीतलहर आहे. शीत लहरीमुळे थंडी वाढली आहे. सगळीकडे बर्फच दिसत आहे.
काश्मीरमधील पाहण्यासारखी ठिकाणे –
काश्मीरमध्ये भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे असली, तरी श्रीनगर, सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम, पुलवामा, अरु व्हॅली, युसमर्ग व्हॅली, बेताब व्हॅली, दाचीगाम नॅशनल पार्क, चंदनवारी, पटनीटॉप, सनासर या ठिकाणांना प्रवाशांनी एकदा भेट दिलीच पाहिजे. या ठिकाणी हिमवृष्टीसोबतच सुंदर निसर्ग नक्कीच पाहायला मिळेल.