मुक्तपीठ टीम
बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणाच्या तपासाची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने केलेल्या अंतर्गत चौकशीत धक्कादायक माहिती समोर आल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत आहेत. आर्यन खानसंबंधित प्रकरणाच्या चौकशीमध्ये एनसीबीला अनेक त्रुटी आढळल्या आहेत. एनसीबी दक्षता विभागाच्या विशेष चौकशी पथकाने आपला अहवाल दिल्ली मुख्यालयाला सादर केला आहे. या अहवालात अनेक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने झाला नसल्याचेही म्हटले आहे. आतापर्यंत नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होईल, हे स्पष्ट नसले तरी सतत प्रसिद्धीच्या झोतात राहत नंतर वादग्रस्तही ठरलेले अधिकारी समीर वानखेडे पुन्हा चर्चेत आले आहेत.
आर्यन खान तपासाची चौकशी कशी झाली?
- एनसीबीच्या दक्षता पथकाला तपासात विभागातील सात-आठ अधिकाऱ्यांविरुद्ध गंभीर दक्षता त्रुटी आणि अनियमितता आढळून आली आहे.
- तपासादरम्यान, पथकाने ६५ साक्षीदार तपासले आणि त्यांचे जबाब नोंदवले.
- या सर्व साक्षीदारांचे जबाब कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आले आहेत.
- यासोबतच दक्षता पथकाने खंडणीचा तपास करण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचा जबाबही नोंदवला आहे.
- मात्र, वसुलीचे कोणतेही पुरावे संघाला मिळालेले नाहीत.
समीर वानखेडेंच्या नेृतत्वाखालील कारवाई शाहरुखच्या मुलामुळे गाजली
- मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील एनसीबी पथकाने २ ऑक्टोबर २०२१ रोजी अचानक छापा टाकला होता.
- यादरम्यान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यालाही अटक करण्यात आली.
- अनेक दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यनला जामीन मिळू शकला.
- अलीकडेच गौरी खानही या विषयावर उघडपणे बोलली.
- आम्ही ज्या टप्प्यातून जात आहोत त्यापेक्षा वाईट काहीही असू शकत नाही, पण एक कुटुंब म्हणून आम्ही नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे आहोत, असे ते म्हणाले होते.
दोषी आढळल्यास काय कारवाई?
- विभागीय चौकशीदरम्यान दक्षता पथकाला काही गडबड आढळून आल्यास त्या आधारे एनसीबीतील तत्कालीन अधिकाऱ्यांवर शिक्षेची शिफारस केली जाऊ शकते.
- चौकशीत एखाद्या अधिकाऱ्याची चूक गंभीर असल्याचे आढळून आल्यास त्याला सेवेतून काढून टाकण्याची शिफारस केली जाऊ शकते.
- या तपासाच्या चौकशीत अनेक आक्षपार्ह गोष्टी आढळल्याची चर्चा असल्यानं आता नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांवर कारवाई होते की राजकीय संरक्षणामुळे ते वाचतात, अशी चर्चा रंगू लागली आहे.