मुक्तपीठ टीम
निवडणुक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटानं तीन चिन्हांचे पर्याय निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यातील दोन चिन्हांवर आता शिंदे गटानंही दावा केल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाच्या यादीतील तीन पर्यायांमध्ये त्रिशुळ आणि उगवता सूर्य आणि मशालचा सामेवश आहे. शिंदे गटानं ठाकरे गटाच्या यादीतील त्रिशुळ आणि उगवता सूर्य ही दोन चिन्हं आपल्याही यादीत ठेवली आहेत. तिसरा पर्याय त्यांनी गदा हा दिला आहे. निवडणूक आयोगासमोर ठेवले आहेत. आता दोन्ही गटांकडून दोन सारख्याच चिन्हांची मागणी करतानाच नावांमध्येही बाळासाहेबांचा उल्लेख असणारी सहापैकी पाच नावे सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे आता आयोग नेमकं काय करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ठाकरे गटाची ठाकरे उल्लेख असलेली ३ नावे, ३ चिन्हे सादर!
- ठाकरे गटाकडून चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे तीन पर्याय ठेवले आहेत.
- त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल असे तीन पर्याय असून उद्धव ठाकरेंकडून रविवारी महाराष्ट्राला संबोधीत करताना ही चिन्हे जाहीररीत्या दाखवली.
- शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे तीन पर्याय नावांसाठी शिवसेनेने सादर केले आहेत.
शिंदे गटाने ठाकरे गटाची २ चिन्हे, एक नाव घेतले!
- आता शिंदे गटानंही ठाकरे गटाने सादर केलेल्या चिन्हांपैकी दोन चिन्हे मागितली आहेत.
- त्रिशूळ आणि उगवता सूर्य ही चिन्हं सारखी आहेत तर तिसरे गदा हे वेगळे आहे.
- तसेच त्यांच्या नावांच्या तीनही पर्यायांमध्ये बाळासाहेबांचा उल्लेख आहे.
- नावासाठीचा पहिला पर्याय तर ठाकरे गटासारखाच शिवसेना बाळासाहेब ठाकरे असा आहे.
- इतर दोन नावं, बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची ही आहेत.
आता निवडणूक आयोग काय करणार?
- खरंतर एका गटाने सादर केलेली चिन्हं आणि नावं माहित असतानाही दुसऱ्या गटाने तेच पर्याय म्हणून देणे कितपत योग्य, असा मुद्दा निवडणूक आयोगासमोर ठाकरे गट उपस्थित करण्याची शक्यता आहे.
- दुसरं असं की ठाकरे अथवा बाळासाहेब ही नावं उद्धव ठाकरेंशी नात्यानं संबंधित आहेत, एकनाथ शिंदेंचं तसं काही नाही.
- त्यामुळे ते जरी शिवसेनेचे नेते असले तरी ते नाव मागण्याच्या त्यांच्या अधिकारावरही शिवसेना आक्षेप घेण्याची शक्यता आहे.
- बिहारमधील लोकजनशक्ती पार्टी या पक्षाचे उदाहरण बोलके आहे. तेथे राम विलास पासवानांच्या मुलाला लोक जनशक्ति पार्टी रामविलास पासवान तर त्यांचे काका पारसानाथांना राष्ट्रीय लोक जनशक्ति पार्टी असे नाव मिळाले.
- मात्र, जाणकारांच्या मते, आतापर्यंतचा या प्रकरणातील अनुभव पाहता,दोन्ही गटांनी सारख्याच चिन्हांचा दावा केल्यामुळं आता निवडणूक आयोग ही दोन्ही चिन्हं बाद करण्याची शक्यता आहे.
- तसेच शिवसेना बाळासाहेब ठाकरे या नावाच्या दोन्ही गटांच्या पहिल्या पर्यायाबद्दलही होऊ शकेल.
- मात्र, इतरही चार पर्यायांमध्ये बऱ्यापैकी साधर्म्य आहे.
- त्यामुळे आता निवडणूक आयोग यासंदर्भात काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.