मुक्तपीठ टीम
प्रभू श्री रामाच्या अयोध्या नगरीत यंदाच्या दिपोत्सवाची तयारी जोरात सुरु आहे. येत्या २१ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत होणाऱ्या दिपोत्सवात १६ लाख दिव्यांची आरस करण्यात येणार आहे. त्यापैकी चार लाख दिव्यांची तयारी झाली आहे. १८ हजार स्वयंसेवक दिवे लावणार असून, त्यात दोन हजार शिक्षक आहेत. अयोध्येतील ३८ घाटांवर दीपोत्सव होणार आहे. हा कार्यक्रम संस्मरणीय व्हावा यासाठी प्रशासनाकडून सातत्याने तयारी करण्यात येत आहे.
दीपोत्सवासाठी रामजन्मभूमी परिसर सुशोभित करण्याचे काम सुरू झाले आहे. यावेळी दीपोत्सवात रामजन्मभूमीची भव्यता आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहे. देशातील प्रमुख लोककलाही येथे पाहायला मिळतील. अवधी, वरळी, मधुबनी, मिथिला येथील चित्रे रामजन्मभूमीच्या गर्भगृहाच्या वैभवात भर घालतील.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २७ सप्टेंबर रोजी सरयू तीरावरील लता मंगेशकर चौकाचे उद्घाटनही केले. रामजन्मभूमी संकुलाला अलौकिक स्वरूप देण्याची तयारीही सुरू झाली आहे. याची जबाबदारी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी आशिष मिश्रा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावेळी राम मंदिराच्या तात्पुरत्या गर्भगृहात भारतीय लोककलाही पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.