मुक्तपीठ टीम
यंदाचा नवरात्रोत्सव अगदी जल्लोषात साजरा होत आहे. मातेच्या दर्शनासाठी मंदिरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. असेच एक मंदिर म्हणजे पालघर जिल्ह्यातील लाखो भक्तांची कुलदैवत असलेल्या डहाणू तालुक्यातील महालक्ष्मी मातेचे मंदिर. या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. या मंदिरात पालघर तसेच महाराष्ट्राबाहेरील गुजरात आणि राजस्थान या परराज्यातूनही मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांना दर्शनासाठी कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी ट्रस्टकडून घेण्यात येत आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरात आदिवासींकडूनच पूजा केली जाते. पालघर मधील महालक्ष्मी मातेच्या अनेक आख्यायिका असून ही माता नवसाला पावणारी असल्याचा समज भाविकांचा आहे. कोल्हापूरची आदिमाता सुरत कडे जात असताना तिला डहाणूतील हा निसर्गरम्य परिसर आवडल्याने ती महालक्ष्मी गडावर वास्तव्यास राहिली अशी ही आख्यायिका सांगितली जाते .महालक्ष्मी मातेची पायथ्याशी आणि गडावर अशी दोन मंदिर असून मातेच्या दर्शनासाठी भक्त गर्दी करताना दिसत आहेत.
डहाणू महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट कडून चोख व्यवस्था-
- डहाणू महालक्ष्मी मंदिर ट्रस्टने या नवरात्रोत्सवासाठी चोख व्यवस्था ठेवली आहे.
- मंदिराचे सुंदर सुशोभीकरण केले आहे.
- मंदिराच्या पूर्ण परिसरात रोषणाई करण्यात आली आहे.
- त्याचसोबत भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसी टीव्ही कॅमेरेदेखील बसविण्यात आले आहेत.
- गरोदर माता व ज्येष्ठ नागरिकांना दर्शन घेण्यासाठी अडचण निर्माण होऊ नये म्हणून स्वतंत्र व्यवस्था महालक्ष्मी मंदिर ट्रस्टकडून करण्यात आली आहे.
या मंदिराची ऐतिहासिक कथा-
- डहाणू तालुक्यात हे मंदिर विव्हळवेढे पश्चिमेला ६०० फूट उंच असणाऱ्या डोंगरावर वसलेले आहे.
- जव्हार संस्थानाचे प्रथम शासक महाराज जयबाजीराव मुकणे यांनी याची स्थापना केली.
- नवरात्रोत्सव आणि अन्य उत्सवाला लाखो भाविकांची गर्दी याठिकाणी उसळते.
- एका गर्भवतीला महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी खूप ओढ लागली होती.
- मात्र इतक्या उंच डोंगरावर जाणे तिच्यासाठी अशक्य होते.
- यावेळी या गरोदर महिलेने देवीला साकडे घातले की, मला तुझे दर्शन घ्यायचे आहे, त्यानंतर देवी गडावरून पायथ्याशी आली व दर्शन दिले, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या आई भावनादेवी सांबरे यांच्या हस्ते या महालक्ष्मी मातेच्या मंदिरात आरती संपन्न झाली. जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था मागील अनेक वर्षांपासून पालघरसह कोकणात आरोग्य शिक्षण या मूलभूत सुविधांवर काम करते . दुर्गम भागातील नागरिकांपर्यंत उत्तम आरोग्य आणि शिक्षण जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या मार्फत पोहोचवले जात असून भावनादेवी सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेची स्थापना झाली आहे. दिव्यांगाना होणारी अडचण लक्षात आल्यावर २०१६ मध्ये जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने दिव्यांगांसाठी शाळा सुरू केली. या दिव्यांग शाळेत ३२ अंध २४ मतिमंद विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यापैकी पाच अंध विद्यार्थिनी यूपीएससी आणि एमपीएससी चा अभ्यास करत आहेत. पालघर जिल्ह्यातील आठ तालुक्यात आठ रुग्णवाहिका जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेने उपलब्ध करून दिल्या असून आणखी दोन रुग्णवाहिका पालघर आणि डहाणू तालुक्यांसाठी देण्यात आल्या. याचं लोकार्पण सोहळा भावना देवी सांबरे यांच्या हस्ते महालक्ष्मी मातेच्या मंदिर परिसरात संपन्न झाला. महालक्ष्मी मातेच्या आरतीचा मान मिळाल्याने भावना देवी सांबरे यांच्याकडून ही समाधान व्यक्त करण्यात आलं .