मुक्तपीठ टीम
कोल्हापूरमध्ये जागतिक पर्यटन दिन आणि नवरात्रोत्सवानिमित्त कोल्हापूरात श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी आलेल्या पर्यटकांना मंदिर परिसरात जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे तसेच पूजा रेखावार उपस्थित होत्या.
पर्यटन वृध्दीच्या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. जागतिक पर्यटनदिनानिमित्त महिला पर्यटकांना प्रातिनिधिक स्वरुपात कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत करण्यात आले. त्याच बरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने देवीचा प्रसाद म्हणून ओटी, अंबाबाईचा फोटो असलेले कॅलेंडर देण्यात आले. कोल्हापूर सराफ संघाकडून कोल्हापुरी साज, ठुशी तर हॉटेल मालक संघाकडून गूळ, काकवी, चटणी, मसाला अशी शिदोरी आणि जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील गड किल्ल्यांची माहिती देणारी पुस्तके अशा एक हजार वस्तूंची भेट देण्यात आली.
कोल्हापूरमध्ये घेण्यात आलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत यावेळी उपस्थित महिला पर्यटकांनी व्यक्त केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष उज्वल नागेशकर, टाकचे अध्यक्ष बळीराम वराडे तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.