मुक्तपीठ टीम
संपूर्ण राज्यात लम्पी आजाराबाबत दक्षतेचा इशारा प्रशासनाला दिला आहे. राज्यातील ३० जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे. अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात आपण वेळीच खबरदारी व उपाययोजना सुरु केल्याने लम्पी आजार नियंत्रणात आहे. पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असे आवाहन महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले.
ज्या जनावरांना लम्पी आजार झाला आहे अशा जनावराना बाजूला ठेवून त्यावर औषधोपचार तत्काळ सुरु केले पाहिजे. पशुसंवर्धन विभागाकडे मुबलक प्रमाणात औषधे व लसीची मात्रा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना, पशुपालकांना लम्पी आजार लसीकरण दृष्टीकोनातून काही कमी पडू दिले जाणार नाही अशी ग्वाही मंत्री विखे-पाटील यांनी दिली. सध्या ज्या गावात लम्पी बाधित जनावरे आढळत आहेत त्या गावाच्या 5 किलोमीटर परिघापर्यत असलेल्या गावात प्राधान्याने लसीकरण केले जात आहे. ५ किलोमीटर असलेली मर्यादा वाढविण्यासाठी प्रयत्न करुन इतर गावातही लसीकरण वाढविण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
लम्पी आजारामूळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरे गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जात आहे. यात दुभत्या गायीसाठी ३० हजार रुपये, शेतात काम करणाऱ्या बैलासाठी २५ हजार रुपये, लहान कारवडी असल्यास १६ हजार रुपये मदत दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतीरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, असे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.
आतापर्यंत या रोगामुळे भारतात दि. १९.०९.२०२२ पर्यंत ८५,६२८ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने राजस्थान मध्ये ५५,४४८ पंजाबमध्ये १७,६५५, गुजरात मध्ये ५,८५७, हिमाचल प्रदेशमध्ये ४३४७ व हरियाणामध्ये २३२१ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. महाराष्ट्रात दि. २६.९.२०२२ पर्यंत जळगाव जिल्ह्यातील १६५, अहमदनगर जिल्ह्यातील ८४, धुळे जिल्ह्यात १७, अकोला जिल्ह्यात १४८, पुणे जिल्ह्यात ६६, लातूर मध्ये १०, औरंगाबाद – २३, बीड – १, सातारा जिल्ह्यात ६२, बुलडाणा जिल्ह्यात ९७, अमरावती जिल्ह्यात ११३, उस्मानाबाद – ३, कोल्हापूर – ४९, सांगली मध्ये १३, यवतमाळ – १, सोलापूर- ७, वाशिम जिल्ह्यात ९, नाशिक – २, जालना जिल्ह्यात १०, पालघर – २, ठाणे-१०, नांदेड – ६, नागपूर जिल्ह्यात ३, रायगड – २, नंदुरबार – २ व वर्धा – २ असे एकूण ९०७ पशुधनाचा मृत्यू झाला आहे. पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.
राज्यामध्ये दि. २६.०९.२०२२ अखेर अशा ३० जिल्ह्यांमधील एकूण १८४१ गावांमध्ये फक्त २७,४३१ जनावरांमध्ये लंपी चर्मरोग प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण २७,४३१ बाधित पशुधनापैकी एकूण १०,५२८ पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरीत बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज दि. २६.९.२०२२ रोजी २५ लक्ष लस प्राप्त झाली असून, यानुसार आज अखेर एकूण १०६.६२ लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील १८४१ गावातील ४३.८० लक्ष पशुधन आणि परिघाबाहेरील २२.८९ लक्ष पशुधन अशा एकूण ६६.६९ लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे. आज दि. २९.९.२०२२ रोजी एकूण ८.५४ लक्ष पशुधनास लसीकरण करण्यात आले आहे.