मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा लॉकडाऊन पाहिजे की नको ते तुम्हीच ठरवा, असे आवाहन महाराष्ट्रातील नागरिकांना केले आहे. त्यासाठी त्यांनी जर नागरिकांनी आवश्यक कोरोना सुरक्षा नियम पाळले तर त्यांना लॉकडाऊन नको, आणि जर सुरक्षा नियम नाही पाळले तर लॉकडाऊन पाहिजे असे मानले जाईल, असे स्पष्ट केले होते. मुंबई मेट्रोच्या यंत्रणेला आणि प्रवाशांनाही कोरोना सुरक्षानियमांची काहीच काळजी नाही, असे दिसत आहे. मुंबईत कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावानंतर महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार सामाजिक अंतर राखणे आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे पण मुंबई मेट्रोत प्रवाशांकडून सामाजिक अंतराचा फज्जा उडवला जात असून याकडे मुंबई मेट्रो व्यवस्थापनाचे दुर्लक्ष आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, पोलीस आयुक्त परमवीर सिंह आणि मुंबई मेट्रोला पत्र पाठवून लक्ष वेधले आहे की सामाजिक अंतर राखले जात नाही. एक व्हिडिओ जारी करत गलगली यांनी सत्यस्थितीची माहिती दिली आहे. आज लाखों प्रवासी प्रवास करत असून मेट्रोच्या गाडीत प्रवासी एकमेकांना रेटून बसतात यामुळे सामाजिक अंतराचे उल्लंघन होत आहे.
सामाजिक अंतर राखण्याचे आणि लक्ष ठेवण्याचे काम मुंबई मेट्रो व्यवस्थापनाचे असून ते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप अनिल गलगली यांचा आहे. प्रवाशांनी उल्लंघन केल्यास मेट्रो व्यवस्थापनाने संबंधित प्रवाशांवर आपल्या स्तरावर कारवाई करावी. सामाजिक अंतर न राखण्यासाठी मुंबई मेट्रोवर कारवाई करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.