मुक्तपीठ टीम
माझ्या प्रिय देशवासियांनों, गेल्या काही दिवसांत चित्ता या विषयाने आपले सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. चित्त्यांबद्दल बोलू इच्छिणारे अनेक संदेश मिळाले आहेत. उत्तर प्रदेशमधले अरुणकुमार गुप्ताजी, तेलंगणामधले के. एन. रामचंद्रन रघुराम जी, गुजरातमधले राजन जी, दिल्लीचे सुब्रत जी अशा अनेकांनी संदेश पाठवले आहेत. चित्ता भारतात परतल्याबद्दल देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांनी आनंद व्यक्त केला आहे. १३० कोटी भारतीय आनंदी आहेत, त्यांना अभिमान वाटतो आहे – हे भारताचे निसर्गप्रेम आहे. यासंदर्भात सर्व लोक एक प्रश्न आवर्जून विचारत आहेत की, मोदीजी, आम्हाला चित्ता बघायची संधी कधी मिळणार?
मित्रहो, एक कृती दल तयार केले आहे. हे कृती दल चित्त्यांवर लक्ष ठेवणार असून ते इथल्या वातावरणात किती सहज रूळतात, हे पाहणार आहे. त्यानुसार काही महिन्यांनी निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला चित्ते बघता येतील. पण तोपर्यंत मी तुम्हा सर्वांना काही कामे सोपवतो आहे.त्यासाठी MyGov मंचावर एक स्पर्धा आयोजित केली जाईल. या स्पर्धेचा एक भाग म्हणून लोकांनी काही गोष्टी शेअर कराव्यात, असे आवाहन मी करतो. चित्त्यांसाठी आपण जी मोहिम राबवतो आहोत, त्या मोहिमेला काय नाव देता येईल? या सर्व चित्यांना कोणत्या नावाने हाक मारता येईल, त्यांचे नामकरण करायचा विचारही आपण करू शकतो. पारंपारिक पद्धतीने आपण त्यांचे नामकरण करू शकलो तर ते उत्तम होईल, कारणआपल्या समाजाशी आणि संस्कृतीशी, परंपरेशी आणि वारशाशी संबंधित असलेली कोणतीही गोष्ट आपल्याला स्वाभाविकपणे आकर्षित करते. इतकंच नाही तर माणसाने प्राण्यांशी कसं वागावं, हे सुद्धा तुम्ही सांगितलं पाहिजे. आपल्या मूलभूत कर्तव्यांमध्येही, प्राणीमात्रांना आदराने वागवण्यावर भर देण्यात आला आहे. तुम्ही या स्पर्धेत जरूर सहभागी व्हावे, असे आवाहन मी तुम्हा सर्वांना करतो. कोणी सांगावं, कदाचित बक्षिस म्हणून चित्ता बघायची पहिली संधी तुम्हालाच मिळेल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आज २५ सप्टेंबर रोजी महान मानवतावादी, विचारवंत आणि देशाचे महान सुपुत्र दीनदयाल उपाध्यायजी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो. कोणत्याही देशातील तरुणांना आपल्या स्वत्वाचा आणि वारशाचा अभिमान वाटू लागतो, तसतसे त्यांना आदिम कल्पना आणि तत्त्वज्ञानाचे आकर्षण वाटू लागते. दीनदयाळजींनी आपल्या आयुष्यात जगातील मोठमोठ्या घडामोडी अनुभवल्या होत्या, हे त्यांच्या विचारांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य होय. अनेक वैचारिक संघर्षांचे ते साक्षीदार होते. त्यामुळेच त्यांनी ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदया’ची संकल्पना देशासमोर ठेवली, जी पूर्णपणे भारतीय होती. दीनदयाळजींचे ‘एकात्म मानवदर्शन’ ही एक अशी संकल्पना आहे, जी विचारसरणीच्या नावाखालील संघर्ष आणि पूर्वग्रहांपासून आपल्याला मुक्त करते. अवघ्या मानवजातीला समान मानणारे भारतीय तत्वज्ञान त्यांनी पुन्हा एकदा जगासमोर आणले. ‘आत्मवत् सर्वभूतेषु’ अर्थात आपण सर्व जीवांना आपल्यासारखे मानले पाहिजे, आपल्यासारखेच वागवले पाहिजे, असे आपल्या धर्मग्रंथात सांगितले आहे. आधुनिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोनातून भारतीय तत्त्वज्ञान जगाला कशा प्रकारे मार्गदर्शन करू शकते, हे दीनदयाळजींनी आपल्याला शिकवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात देशात एक प्रकारची न्यूनगंडाची भावना होती, त्यातून मुक्त करून त्यांनी आपली स्वतःची बौद्धिक जाणीव जागृत केली. आपली संस्कृती आणि अस्मिता आपण अभिव्यक्तकरू शकू, तेव्हाच आपले आपले स्वातंत्र्यसार्थ ठरू शकते, असे ते म्हणत. या कल्पनेच्या बळावर त्यांनी देशाच्या विकासाचा दृष्टीकोन निर्माण केला होता. देशाच्या तळागाळातील व्यक्तीच्या परिस्थितीवरून देशाच्या प्रगतीचे मोजमाप करता येते, असे, दीनदयाळ उपाध्याय जी म्हणायचे. स्वातंत्र्याच्या अमृत काळात आपण दीनदयाळजींचे विचार जास्तीतजास्त समजून घेतले आणि त्यापासून शिकवण घेत राहिलो, तर आपल्याला सर्वांनाच देशाला पुढे नेण्याची प्रेरणा मिळत राहिल.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आजपासून तीन दिवसांनंतर म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी अमृत महोत्सवातला एक विशेष दिवस येतो आहे. या दिवशी आपण, भारतमातेचे शूर सुपुत्र भगतसिंग यांची जयंती साजरी करणार आहोत. भगतसिंग यांच्या जयंतीपूर्वी त्यांना आदरांजली देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. चंदीगड विमानतळाला आता शहीद भगतसिंग यांचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीर्घ काळापासून या निर्णयाची प्रतीक्षा होती. या निर्णयाबद्दल मी चंदीगड, पंजाब, हरियाणा आणि देशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो. मित्रहो, आपल्या स्वातंत्र्यसैनिकांकडून प्रेरणा घेऊन, त्यांच्या आदर्शांना अनुसरून त्यांच्या स्वप्नांमधला भारत आपण घडवूया, हीच त्यांना सार्थ श्रद्धांजली ठरेल. हुतात्म्यांची स्मारके, त्यांची नावे दिलेली स्थाने आणि संस्थांची नावे आपल्याला कर्तव्यपूर्तीसाठी प्रेरणा देतात. काही दिवसांपूर्वीच कर्तव्य पथावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारून देशाने असाच एक प्रयत्न केला आहे आणि आता चंदीगड विमानतळाला शहीद भगतसिंग यांचे नाव देणे, हे या दिशेने उचललेले आणखी एक पाऊल आहे. अमृत महोत्सवात स्वातंत्र्यसैनिकांशी संबंधित विशेष प्रसंग आपण साजरे करतो, त्याचप्रमाणे प्रत्येक तरुणाने २८ सप्टेंबर रोजी काहीतरी नवीन करून पाहावे, असे मला वाटते.
माझ्या प्रिय देशवासियांनो, खरे तर २८ सप्टेंबर हा दिवस साजरा करण्याचे आणखी एक कारण तुमच्याकडे आहे. काय, ते ठाऊक आहे का! मी फक्त दोन शब्द उच्चारतो, पण मला माहित आहे की ते ऐकल्यावर तुमचा उत्साह चार पटीने वाढेल. हे दोन शब्द आहेत – सर्जिकल स्ट्राइक. वाढला ना उत्साह! आपल्या देशात सुरु असलेल्या अमृत महोत्सवाची मोहीम उत्साहात साजरी करूया, आपल्या आनंदात सर्वांना सामावून घेऊ या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, असे म्हणतात की आयुष्यातल्या संघर्षातून तावून-सुलाखून बाहेर पडलेल्या व्यक्तीसमोर कोणतेही संकट टिकत नाही. आपल्या दैनंदिन जीवनात, आपण अनेक सहकाऱ्यांना बघतो, जे शारीरिक त्रुटींमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करत आहेत. असे अनेक लोक आहेत, ज्यांना ऐकू येत नाही किंवा ते बोलू शकत नाहीत. अशा सहकाऱ्यांसाठी सांकेतिक भाषा हा सर्वात मोठा आधार आहे. मात्र भारतात वर्षानुवर्षे सांकेतिक भाषेसाठी कोणतेही हावभाव निर्धारित नव्हते, कोणतीही मानके नव्हती. या अडचणींवर मात करण्यासाठी २०१५ साली भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. या संस्थेने आतापर्यंत दहा हजार शब्द आणि हावभावांचा शब्दकोश तयार केला आहे, याचा मला मनापासून आनंद वाटतो.
दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच २३ सप्टेंबर रोजी सांकेतिक भाषा दिनानिमित्त अनेक शालेय अभ्यासक्रमही सांकेतिक भाषेत सुरू करण्यात आले आहेत. मानकांनुसार सांकेतिक भाषेचा दर्जा कायम राखण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही बराच भर देण्यात आला आहे. सांकेतिक भाषेचा जो शब्दकोश तयार करण्यात आला आहे, त्याचे व्हिडिओ तयार करून त्याचा सातत्याने प्रसार केला जातो आहे. अनेक लोकांनी, अनेक संस्थांनी यूट्यूबवर भारतीय सांकेतिक भाषेत आपल्या वाहिन्या सुरू केल्या आहेत; म्हणजेच 7-8 वर्षांपूर्वी सांकेतिक भाषेबद्दल देशात जी मोहीम सुरू झाली होती, त्याचा लाभ, आता माझ्या लक्षावधी दिव्यांग बंधू-भगिनींना मिळतो आहे. हरियाणाच्या रहिवासी असणाऱ्या पूजाजींनी या भारतीय सांकेतिक भाषेबद्दल आनंद व्यक्त केला आहे. यापूर्वी त्यांना आपल्या मुलाशी संवाद साधता येत नव्हता. 2018 साली त्यांनी सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण घेतले आणि त्य़ानंतर या मायलेकांचे जगणे सोपे झाले आहे. पूजाजींच्या मुलानेही सांकेतिक भाषा शिकून घेतली आणि आपल्या शाळेत कथाकथन स्पर्धेत बक्षीसही जिंकून दाखवले. टिंकाजी यांची सहा वर्षांची मुलगी आहे, तिला ऐकू येत नाही. टिंकाजींनी आपल्या मुलीला सांकेतिक भाषेचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी पाठवले, पण त्यांना स्वतःला सांकेतिक भाषा येत नव्हती, त्यामुळे त्यांना आपल्या मुलीशी संवाद साधता येत नव्हता. आता टिंकाजींनी सुद्धा सांकेतिक भाषेचे प्रशिक्षण घेतले आहे आणि आता या माय लेकी सुद्धा एकमेकींशी भरपूर गप्पा मारतात. केरळमधल्या मंजूजीं यांनाही या प्रशिक्षणाचा खूप फायदा झाला आहे. मंजूजी यांना जन्मापासून ऐकू येत नाही, इतकेच नाही तर त्यांच्या आई-वडिलांचीही हीच परिस्थिती होती. अशात सांकेतिक भाषा हे या संपूर्ण कुटुंबासाठी संवादाचे साधन बनले आहे. आता तर मंजूजींनीही सांकेतिक भाषेच्या शिक्षिका होण्याचा निर्णय घेतला आहे.
मित्रहो, भारतीय सांकेतिक भाषेबद्दल जागरूकता वाढली पाहिजे, म्हणूनसुद्धा मी ‘मन की बात’ कार्यक्रमात याबाबत चर्चा करतो आहे. या माध्यमातून आपण आपल्या दिव्यांग सहकाऱ्यांची जास्तीत जास्त मदत करू शकू. बंधू आणि भगिनींनो, काही दिवसांपूर्वी मला ब्रेल लिपीतील हेमकोशाची प्रत सुद्धा मिळाली. हेमकोश हा आसामी भाषेतल्या सर्वात जुन्या शब्दकोशांपैकी एक आहे. तो एकोणिसाव्या शतकात तयार करण्यात आला होता. सुप्रसिद्ध भाषातज्ञ हेमचंद्र बरुआ यांनी त्याचे संपादन केले होते. हेमकोशाची ब्रेल आवृत्ती सुमारे 10,000 पृष्ठांची आहे आणि ती 15 पेक्षा जास्त खंडांमध्ये प्रकाशित होणार आहे. यातीलएक लाखापेक्षा जास्त शब्दांचे भाषांतर करावे लागणार आहे. या संवेदनशील प्रयत्नाचे मी मनापासून कौतुक करतो. असे सर्व प्रयत्न, दिव्यांग सहकाऱ्यांचे कौशल्य आणि क्षमता वाढवण्यास मोठा हातभार लावतात. पॅरा स्पोर्ट्स क्षेत्रातही भारताच्या यशाचा ध्वज उत्तुंग फडकतो आहे. अनेक स्पर्धांमध्ये आपण सर्वच या यशाचे साक्षीदार ठरलो आहोत. आज तळागाळातील दिव्यांगांना फिटनेस कल्चर अर्थात तंदुरूस्ती जोपासण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक जण पुढे येत आहेत. यामुळे दिव्यांगांचा आत्मविश्वास दुणावला आहे.
माझ्या प्रिय देशवासियांनो, मी काही दिवसांपूर्वी सुरत मधील अन्वीला भेटलो. या भेटीबद्दल मला ‘मन कि बात’ च्या सर्व श्रोत्यांना नक्कीच सांगायला आवडेल; कारण अन्वी आणि अन्वीचा योग यांच्यासोबाबत झालेली माझी भेट खूपच स्मरणीय होती. मित्रांनो, अन्वी जन्मतःच डाऊन सिंड्रोमची रुग्ण आहे आणि लहानपणापासूनच ती हृदयरोगाचा सामना करत आहे. ती केवळ तीन महिन्यांची असताना तिची ओपन हार्ट सर्जरी झाली होती. इतकी सगळी संकटे येऊन देखील अन्वीने आणि तिच्या आई-बाबांनी कधीच हार मानली नाही. अन्वीच्या आई-वडिलांनी डाऊन सिंड्रोमबाबत सर्व माहिती गोळा केली आणि अन्वीला अधिकाधिक आत्मनिर्भर करण्याचा निश्चय केला. त्यांनी अन्वीला पाण्याचा ग्लास कसा उचलायचा, बुटांची नाडी (लेस) कशी बांधायची, कपडयांची बटणं कशी लावायची अशा छोट्या छोट्या गोष्टी शिकवायला सुरुवात केली. कोणती वस्तू कुठे ठेवली आहे, चांगलया सवयी कोणत्या या सर्व गोष्टी त्यांनी तिला खूप धीराने शिकवल्या. अन्वीने या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी दाखवलेली इच्छाशक्ती, आपले कौशल्य यासगळ्यामुळे तिच्या आई-वडिलांना देखील खूप बळ मिळाले. त्यांनी अन्वीला योग शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. अन्वी आपल्या दोन पायांवर देखील व्यवस्थित उभी राहू शकत नव्हती, परंतु अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील तिच्या आई-वडिलांनी अन्वीला योग शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. पहिल्यांदा जेव्हा ती योग शिक्षकांकडे गेली तेव्हा ते खूपच संभ्रमात होते की हि चिमुरडी योग करू शकेल की नाही; परंतु त्या शिक्षकांना अंदाज नव्हता की अन्वी किती जिद्दी आहे. तिने आपल्या आईसोबत योग अभ्यास करायला सुरुवात केली आणि आता तर ती योग निपुण झाली आहे. अन्वी आता देशभरात होणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये भाग घेते आणि पदक जिंकते. योगने अन्वीला नवीन आयुष्य प्रदान केले आहे. अन्वीने योग आत्मसात करून आयुष्य आत्मसात केले आहे. योगमुळे अन्वीच्या आयुष्यात अद्भुत बदल बघायला मिळाले आहेत असे अन्वीच्या आई-वडिलांनी मला सांगितले. आता तिचा आत्मविश्वास खूपच वृद्धिंगत झाला आहे. योगमुळे अन्वीच्या शारीरिक आरोग्यात देखील सुधारणा झाली आहे आणि आता तिला खूपच कमी औषधे घ्यावी लागतात. योगमुळे अन्वीला झालेल्या लाभांचा, देश-परदेशातील ‘मन कि बात’ च्या श्रोत्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करावा अशी माझी इच्छा आहे. अन्वी हे एक उत्तम उदाहरण आहे असे मला वाटते. ज्यांना योगच्या सामर्थ्याची चाचपणी करायची आहे त्यांनी पुढाकार घेऊन अन्वीच्या या यशाचे अध्ययन करावे आणि योगचे सामर्थ्य जगासमोर आणावे. असे कोणतेही संशोधन जगभरातील डाऊन सिंड्रोमने पीडित मुलांसाठी खूपच फायदेशीर ठरेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी योग खूपच फायदेशीर आहे हे आता सर्व जगाने मान्य केले आहे. विशेषतः मधुमेह आणि रक्तदाबाशी निगडित समस्या सोडवण्यात योगची खूपच मदत होते. योगची हीच ताकद लक्षात घेत संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले. आता संयुक्त राष्ट्रसंघाने भारताच्या अजून एका प्रयत्नाला अधोरेखित करून त्याला सन्मानित केले आहे; आणि तो प्रयत्न आहे ‘भारतातील उच्चरक्तदाब नियंत्रण उपक्रम’ या उपक्रमा अंतर्गत रक्तदाब पीडित रुग्णांवर सरकारी सेवा केंद्रांमध्ये उपचार केले जातात. या उपक्रमाने ज्याप्रकारे आंतरराष्ट्रीय संस्थांचे लक्ष आपल्याकडे केंद्रित केले आहे ते अभूतपूर्व आहे. ज्या लोकांवर उपचार करण्यात आले त्यापैकी जवळपास अर्ध्या लोकांचा रक्तदाब आता नियंत्रणात आहे ही आपल्यासाठी उत्सवर्धक बाब आहे. आपल्या अथक प्रयत्नांनी हा उपक्रम यशस्वी करणाऱ्या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो.
मित्रांनो, मानवी आयुष्याचा जीवन प्रवास हा निरंतर पाण्याशी जोडलेला आहे – मग तो समुद्र असो, नदी असो किंवा मग तलाव. जवळपास साडे सात हजार किलोमीटरहुन अधिक लांबीचा समुद्रकिनारा भारताला लाभल्यामुळे समुद्राशी आपले एक अतूट नाते आहे. अनेक राज्य आणि बेटांमधून हि सागरी सीमा जाते. भारतातील विविध समुदाय आणि विविधतेने नटलेली संस्कृती इथे विकसित होताना आपण पाहू शकतो. इतकेच नव्हे तर या सागरी किनाऱ्यांवर राहणाऱ्या लोकांची खाद्य संस्कृती देखील लोकांना आकर्षित करते. परंतु या सर्व रोचक बाबींसोबतच या सगळ्याचा एक दुखद पैलू देखील आहे. आपला हा सागरी क्षेत्र पर्यावरणाशी निगडित अनेक समस्यांचा सामना करत करत आहे. एकीकडे हवामान बदल, सागरी पर्यावरणाला खूप मोठा धोका निर्माण होत आहे तर दुसरीकडे आपल्या समुद्र किनाऱ्यावरील अस्वछता खूपच त्रासदायक आहे. या सर्व समस्या सोडविण्यासाठी कठोर आणि निरंतर प्रयत्न करणे हि आपली जबाबदारी आहे. देशातील सागरी परिसर स्वच्छ करण्याचा एक प्रयत्न – ‘स्वच्छ सागर – सुरक्षित सागर’ या विषयी मी आज इथे बोलू इच्छितो. ५ जुलै रोजी शुभारंभ झालेल्या या अभियानाची १७ सप्टेंबर विश्वकर्मा जयंती दिवशी सांगता झाली. याच दिवशी सागरी किनारा स्वछता दिन देखील होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सुरु झालेली हि मोहीम ७५ दिवस सुरु होती. या मधील लोकसहभाग वाखाणण्याजोगा होता. या मोहिमे दरम्यान संपूर्ण अडीच महिने स्वच्छतेचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गोव्यामध्ये एक मोठी मानवी शृंखला तयार करण्यात आली होती. काकीनाडा येथे गणपती विसर्जना दरम्यान लोकांना प्लास्टिकच्या वापरामुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती देण्यात आली. ‘एनएसएस’च्या अंदाजे ५००० तरुण विद्यार्थ्यांनी तर ३० टनांहून अधिक प्लास्टिक गोळा केले. ओदिशामध्ये २० हजारांहून अधिक शाळकरी विद्यार्थ्यांनी आपल्या सोबतच आपले कुटुंब आणि शेजारील लोकांना ‘स्वच्छ सागर-सुरक्षित सागर’ मोहिमेसाठी प्रोत्साहित करण्याची शपथ घेतली. या अभियानात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे मी अभिनंदन करतो.
निवडून आलेले अधिकारी, विशेषतः शहरांचे महापौर आणि गावचे सरपंच यांच्यासोबत जेव्हा मी संवाद साधतो तेव्हा त्यांना स्वच्छता उपक्रमांमध्ये स्थानिक समुदाय आणि स्थानिक संस्थांना सहभागी करून घेण्याचा आणि नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्याचा आग्रह करतो.
बंगळुरू मध्ये एक टीम आहे – युथ फॉर परिवर्तन. मागील आठ वर्षांपासून हि टीम स्वच्छता आणि इतर सामुदायिक उपक्रम राबवित आहे. त्याचे बोधवाक्य खूपच स्पष्ट आहे ‘तक्रार करणे थांबवा कृती करा’. या टीमने आजवर शहरातील ३७० हुन अधिक जागांचे सौंदर्यीकरण केले आहे. प्रत्येक ठिकाणी युथ फॉर परिवर्तनाच्या अभियाननं शम्भर ते दीडशे नागरिकांना सहभागी करून घेतले आहे. प्रत्येक रविवारी सकाळी हा कार्यक्रम सुरु होऊन दुपारपर्यंत चालतो. या कार्यक्रमा दरम्यान स्वच्छता करण्यासोबतच भिंतींवर चित्र आणि कलात्मक रेखाटने केली जातात. अनेक ठिकाणी तुम्हाला प्रसिद्ध व्यक्तींची रेखाटने आणि त्यांची प्रेरणादायी वाक्य देखील पहायला मिळतील. बंगळुरूच्या युथ फॉर परिवर्तनाच्या प्रयत्नांनंतर मी आता तुम्हाला मेरठ मधील ‘कबाड से जुगाड’ या अभियानाबाबत देखील सांगू इच्छितो. हे अभियान पर्यावरण सुरक्षे सोबतच शहराच्या सौंदर्यीकरणाशी देखील निगडित आहे. या अभियानचे वैशीष्ट्य म्हणजे यामध्ये लोखंडी भंगार, टाकाऊ प्लास्टिक, जुने टायर आणि ड्रम यासारख्या निरुपयोगी झालेल्या वस्तूंचा उपयोग केला जातो. हे अभियान म्हणजे कमी खर्चात सार्वजनिक जागांचे सौंदर्यीकरण कसे केले जावे याचे एक उत्तम उदाहरण आहे. या अभियानाशी निगडित लोकांचे मी मनःपूर्वक कौतुक करतो.
माझ्या प्रिय देशवासीयांनो, सध्या देशात सर्वत्र सणांचा उत्साह आहे. उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे. या दिवशी आपण ‘माँ शैलपुत्री’ या देवीच्या पहिल्या रूपाची पूजा करणार. इथून पुढे नऊ दिवस नियम-संयम, उपवासाचे आणि नंतर विजयादशमीचा उत्सव देखील साजरा होणार. एकप्रकारे आपल्या सणांमध्ये विश्वास आणि अध्यात्मासोबतच सखोल संदेश देखील दडलेला आहे. शिस्त आणि संयमाने सिद्धीची प्राप्ती आणि त्यानंतर विजयोत्सव, आपल्या आयुष्यात एखादे लक्ष्य साध्य करण्याचा हाच तर मार्ग आहे. दसऱ्यानंतर धनत्रयोदशी आणि दिवाळी हे सण देखील येणार आहेत.
मित्रांनो, मागील काही वर्षांपासून आपल्या देशामध्ये सणांसोबत एक नवीन संकल्प देखील आपण घेतला आहे. तुम्हां सर्वांना माहीतच आहे, हा संकल्प आहे – ‘व्होकल फॉर लोकल’. आता आपण आपल्या सणाच्या आनंदात आपल्या स्थानिक कारागिरांना, शिल्पकारांना आणि व्यापाऱ्यांना देखील सामावून घेत आहोत. आगामी २ ऑक्टोबर ला येणाऱ्या गांधी जयंतीचे औचित्य साधत हे अभियान मोठ्या स्तरावर राबविण्याचा संकल्प करूया. खादी, हातमाग, हस्तकला या सर्व उत्पादनांसोबत स्थानिक वस्तू देखील नक्की विकत घ्या. जेव्हा सगळे एखाद्या सणामध्ये सहभागी होतात तोच त्या सणाचा खरा आनंद आहे; म्हणूनच स्थानिक उत्पादनांशी निगडित लोकांना आपण पाठबळ दिले पाहिजे. आपण सणाच्यावेळी ज्या भेटवस्तू देतो त्यामध्ये अशा उत्पादनांचा समावेश करणे हा एक उत्तम, पर्याय आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवादरम्यान आपण आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट देखील साध्य करण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे यावेळी हे अभियान अधिक विशेष आहे. स्वातंत्र्य वीरांना खऱ्या अर्थाने हि श्रद्धांजली असेल. यावेळी तुम्ही खादी, हातमाग, हस्तकलेची उत्पादने विकत घेण्याचे सर्व विक्रम मोडून काढा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. सणांमध्ये पॅकिंग आणि पॅकेजिंगसाठी मोठ्याप्रमाणात प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर केला जातो. स्वच्छतेच्या या अभियानात प्लास्टिकचा हानिकारक कचरा हा देखील आपल्या सणांच्यामागे असलेल्या भावनांच्या विरोधी आहे. म्हणूनच, आपण स्थानिक स्तरावर उत्पादित प्लास्टिक विरहित पिशव्यांचा आपण उपयोग केला पाहिजे. आपल्या इथे तागाच्या, सुती, केळीच्या झाडापासून तयार केलेल्या अशा पारंपरिक पिशव्यांचा वापर पुन्हा एकदा वृद्धिंगत होत आहे. सणाच्या निमित्ताने याला प्रोत्साहन देणे हि आपली जबाबदारी आहे आणि स्वच्छतेसोबतच आपली आणि पर्यावरणाची देखील काळजी घ्या.
माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या शास्त्रामध्ये सांगितले आहे- ‘परहित सरिस धरम नहीं भाई’
याचाच अर्थ, दुसऱ्यांचे हित करण्यासमान, दुसऱ्यांची सेवा, उपकार करण्यासारखा दुसरा कोणताही धर्म नाही. मागील काही दिवसांमध्ये देशात, समाजसेवेच्या या भावनेची आणखी एक झलक आपल्याला पहायला मिळाली. लोक स्वःहून पुढाकार घेऊन एखाद्या क्षयरोग्याला दत्तक घेत आहेत हे तुम्ही पाहिलंच असेल, त्याला सकस आहार मिळण्याचा संकल्प करत आहेत. क्षयरोयमुक्त भारत अभियानाचा हा एक भाग आहे ज्याचा मुख्य आधार हा लोकसहभाग आणि कर्तव्य भावना आहे. योग्य सकस आहार, वेळेवर औषधांनीच क्षयरोगाचे उपचार शक्य आहेत. लोकसहभागाच्या या ताकदीमुळे वर्ष २०२५ पर्यंत भारत नक्कीच क्षयरोग मुक्त होईल असा माझा विश्वास आहे.
मित्रांनो, दादर-नगर हवेली आणि दमन-दिव या केंद्रशासित प्रदेशातील एक हृदयस्पर्शी उदाहरण मला कळले आहे. इथल्या आदिवासी क्षेत्रात राहणाऱ्या जिनु रावतीया यांनी मला एक पत्र पाठविले आहे. त्यांनी या पत्रात लिहिले आहे कि, तिथे सुरु असलेल्या ग्राम दत्तक कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ५० गावं दत्तक घेतली आहेत. यात जिनु यांचे गाव देखील आहे. हे वैद्यकीय विद्यार्थी गावक गावकऱ्यांना आजारा आणि त्याच्या उपचारां विषयी जागरूक करतात, आजारी व्यक्तींना देखील मदत करतात तसेच सरकारी योजनांची देखील माहिती देतात. परोपकाराच्या या भावनेमुळे गावकऱ्यांच्या आयुष्यात नवीन आनंद निर्माण झाला आहे. यासाठी मी वैद्यकीय महाविद्यलयाच्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो.
मित्रानो, ‘मन कि बात’ मध्ये नवीन नवीन विषयांवर चर्चा होत असते. अनेकदा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या जुन्या विषयामध्ये अधिक सखोल अभ्यास करण्याची देखील संधी मिळते. मागील महिन्यातील ‘मन कि बात’ मध्ये मी भरड धान्य आणि वर्ष २०२३ ला ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ म्हणून साजरे करण्याविषयी चर्चा केली होती. लोकांमध्ये या विषयाबाबत खूपच उत्सुकता आहे. लोकांनी कशाप्रकारे भरड धान्याला आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केले आहे या संबंधित अनेक पत्र लोकांनी मला पाठवली आहेत. काही लोकांनी भरड धान्यांपासून तयार होणाऱ्या पारंपरिक पदार्थांची देखील माहिती दिली आहे. हा एक मोठ्या बदलाचा संकेत आहे. लोकांचा उत्साह पाहता, आपल्याला एक ई-बुक तयार केली पाहिजे असे मला वाटते. ज्यामध्ये लोकं भरड धान्यांपासून बनणारे पदार्थ आणि आपले अनुभव लिहू शकतील. यामुळे ‘आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष’ सुरु होण्यापूर्वीच आपल्याकडे भरड धान्याविषयी एक सार्वजनिक विश्वकोश देखील तयार असेल आणि त्यानंतर आपण तो MyGov पोर्टल वर प्रकाशित करू शकतो.
मित्रांनो, ‘मन कि बात’ मध्ये यावेळी इतकेच, परंतु जाता जाता मी तुम्हाला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेविषयी सांगू इच्छितो. २९ सप्टेंबर पासून गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले आहे. काही वर्षाच्या अंतराळानंतर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होत असल्यामुळे हि एक विशष संधी आहे. कोविड महामारीमुळे मागील आयोजन रद्द करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूला माझ्या खूप खूप शुभेच्छा. खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी यादिवशी मी देखील उपस्थित राहणार आहे. तुम्ही देखील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नक्की बघा आणि आपल्या आवडत्या खेळाडूला प्रोत्साहन द्या. आता मी तुमचा निरोप घेतो. पुढील महिन्याच्या ‘मन कि बात’ मध्ये नवीन विषयांसोबत पुन्हा आपली भेट होईल.
धन्यवाद.
नमस्कार.