मुक्तपीठ टीम
राज्य शासनाच्या सामाजिक व कल्याणकारी योजनांचा लाभ असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना मिळावा, यासाठी कामगार आयुक्त कार्यालयाने असंघटित कामगारांची नोंदणी केंद्र सरकारच्या ई-श्रम या वेब पोर्टलवर करण्यासाठी कामगारांना प्रोत्साहित करावे. मुंबईतील फेरीवाले आणि मच्छीमार यांची असंघटित कामगार म्हणून जास्तीत जास्त नोंदणी व्हावी, यासाठी आवश्यकतेनुसार त्यांच्या भागात शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी असंघटित कामगार अधिनियमांतर्गत स्थापित समितीला केल्या.
असंघटित कामगारांची नोंदणी वाढविण्यासाठी मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस मुंबई शहर कामगार उपायुक्त निलांबरी भोसले, सहायक कामगार आयुक्त तथा समिती सदस्य सचिव सतीश तोटावार तसेच समितीचे सदस्य उपस्थित होते.
मुंबई शहर जिल्ह्याचे काम राज्यात वरच्या क्रमांकावर आहे याबद्दल समितीने समाधान व्यक्त केले. असंघटित कामगारांच्या नोंदणीसाठी केंद्र सरकारने ई – श्रम पोर्टल तयार केले असून यावर देशातील कामगार स्वतः नोंदणी करू शकतात तसेच नागरी सुविधा केंद्रावरही ते नोंदणी करू शकतात. ही नोंदणी प्रत्येक असंघटित कामगारांनी जास्तीत जास्त प्रमाणात करावी, यासाठी कामगार विभागाने मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी आणि प्रत्येक कामगाराला या नोंदणी द्वारे ई – श्रम कार्ड उपलब्ध करून देण्याच्या सूचना राजीव निवतकर यांनी दिल्या.
या श्रमिक कार्डमुळे असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. त्याचप्रमाणे या कामगारांच्या क्रयशक्तीचा मागोवा घेऊन त्यांना क्षमतेप्रमाणे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
या नोंदणीसाठी आधार कार्ड, बँक पासबुक, मोबाईल क्रमांक असणे आवश्यक असून नोंदणी करणारा कामगार आयकर भरणारा नसावा. तसेच तो भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा. त्याचप्रमाणे शासनाने निश्चित केलेल्या ३०० उद्योगांमध्ये तो काम करणारा असावा, असे या नोंदणीसाठीचे निकष आहेत.