मुक्तपीठ टीम
शहराचे हृदय असलेल्या तळजाई टेकडीवर पाच एकर जागेत वॅन्डरलॅन्डे इंडिया, श्री कल्पतरू संस्थान आणि वनविभाग पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या ‘ग्रीन लंग्ज’ या मानवनिर्मित जंगलाचे उद्घाटन करण्यात आले. या ‘ग्रीन लंग्ज’ जंगलामुळे पुणेकरांना ऑक्सिजन मिळणार आहे. शिवाय, कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे. वॅन्डरलॅन्डे इंडियाचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक मार्टिन मासलँड, डेटा अनॅलिटीक्सच्या प्रमुख रश्मी चेथन, श्री कल्पतरु संस्थानचे संस्थापक व ट्री-मॅन ऑफ इंडिया विष्णू लांबा, सहाय्यक उपवनसंरक्षक यांच्या हस्ते झाले.
मार्टिन मासलँड म्हणाले, “शाश्वतता ‘वॅन्डरलॅन्डे’च्या केंद्रस्थानी असते. एक जबाबदार कंपनी म्हणून आम्ही समाजाच्या आणि पर्यावरणाच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत. वनविभाग आणि श्री कल्पतरू संस्थान यांच्या सहकार्याने आम्हाला ‘ग्रीन लंग्ज’ सारखा उपक्रम साकार करता आला, याचा आनंद आहे. हा उपक्रम अधिकाधिक यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल.” राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या.
मानवी अतिक्रमणामुळे जंगलांतील दुर्मिळ वनसंपदा नामशेष होत चालली आहे. या वनस्पतींचा प्राणवायू, औषधे यांसाठी उपयोग होत असतो. मात्र यांची संख्या घटल्याने दुर्मिळ वनस्पती सापडणे कठीण झाले आहे. योग्य वेळीच यांचे जतन केले गेले नाही तर भविष्यात या झाडांची चित्र केवळ पुस्तकात पाहायला मिळतील. अशी वेळ येऊ नये म्हणूनच दुर्मिळ झाडांची लागवड करण्यात येत आहे, असे विष्णू लांबा यांनी सांगितले. पुढील दोन वर्षे या जंगलाची देखभाल श्री कल्पतरू संस्थानतर्फे करण्यात येणार आहे.
दीपक पवार म्हणाले, “पृथ्वीच्या आणि मानवी आरोग्यासाठी वातावरणातील बदल घटक ठरत आहेत. त्यामुळे नामशेष होत चाललेल्या वनस्पतींचे जतन झाले पाहिजे. ‘ग्रीन लंग्ज’सारखे उपक्रम सर्वत्र राबविण्याचा प्रयत्न केला जाईल. वनविभागाने नेहमीच तळजाई टेकडीवर पर्यटक व निसर्गप्रेमींसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला आहे. वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी व सुरक्षितेसाठी प्रयत्न होत असून त्याकरिता प्रतिबंधक उपाय योजना राबविल्या जात आहेत.”