गौरव संतोष पाटील / पालघर
खाकी वर्दीतील माणूसपण जेव्हा संवेदनशीलतेनं समोर येतं तेव्हा सामान्य माणसांची पोलीस दलाविषयी आपुलकी वाढते. पालघर पोलिसांनी सध्या राबवलेल्या जनसंवाद यात्रा या उपक्रमात पारंपारिक तारपा नृत्य स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेला २८पेक्षा जास्त संघांचा मिळालेला प्रतिसाद हा वाढती आपुलकी दाखवणाराच आहे.
पालघर हा आदिवासींची संख्या जास्त असलेला जिल्हा. दुर्गम भागातील डोंगररांगांमध्ये वसलेल्या पाड्यांवर राहणारे आदिवासी आपली संस्कृती परंपरा जपून आहेत. सध्या पालघर पोलीस दलामार्फत सर्वच स्तरांतील नागरिकांना जोडण्यासाठी ग्रामीण भागात जनसंवाद यात्रा सुरू आहे. या यात्रेचा एक भाग म्हणून तारपा या पारंपरिक नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.
पोलिसांनी आयोजित केलेल्या या स्पर्धेत २८पेक्षा जास्त संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. तारपा हे पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केलं करत रंगत वाढवली. या उपक्रमात पालघरच्या ग्रामीण आदिवासी भागात असलेल्या अनैतिक रूढी परंपरा, बालविवाह, पोक्सो, वाहन चालवताना घ्यायची काळजी, अफवांवर विश्वास ठेवू नये अशा विविध विषयांची माहिती देत जनजागृती करण्यात आली . पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेच आयोजन करण्यात आलं असून नृत्य स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघाला दहा हजार रुपये , द्वितीय सात हजार रुपये , तर तृतीय पाच हजार रुपयांच पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं .
विशेष म्हणजे कासा येथे तारपा नृत्य स्पर्धेत केवळ आदिवासी बांधवच नाही तर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनीही आपल्या सहकाऱ्यांबरोबर तारपा नृत्यावर ताल धरला.
जनसंवाद अभियान अंतर्गत तारपा नृत्य स्पर्धा पुरस्कार
- प्रथम क्रमांक
आदिवासी क्रांतिवीर राघोजी बांगरे कला पथक शेनसरी ता. डहाणू - द्वितीय क्रमांक
गावदेवी तारपा नृत्य साखरशेत ता. जव्हार जि. पालघर - तृतीय क्रमांक
ओसरवीरा तारपा नृत्य डहाणू