मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये भाजपची विद्यार्थी संघटना अभाविपला मोठा फटका बसला आहे. वाराणसीमधील महात्मा गांधी काशी विद्यापीठातील निवडणुकीत काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या एनएसयूआय आणि समाजवादी पार्टीच्या विद्यार्थी संघटनेनं मोठा विजय मिळवला आहे. या निवडणुकीत एनएसयूआय आणि समाजवादी पक्षाच्या विद्यार्थी संघटनेनं आघाडी केली होती. भाजपाची विद्यार्थी संघटना चारही महत्वाच्या जागांसाठी झालेली निवडणूक हारली आहे.
एनएसयूआय ने महात्मा गांधी काशी विद्यापीठातील उपाध्यक्ष, महामंत्रीसह ६ जागांवर कब्जा मिळवला आहे. या ठिकाणी एकूण ८ जागांवर निवडणूक पार पडली. त्यातील ६ जागांवर एनएसयूआयकडून उपाध्यक्षपदी संदीप पाल आणि महामंत्री पदाच्या जागेवर प्रफुल्ल पांडेय यांनी विजय मिळवला आहे. तर पुस्तकालय मंत्री म्हणून अपक्ष उमेदवार असणाऱ्या आशीष गोस्वामीचा विजय झालाय. या निवडणुकींमध्ये समाजवादी पक्षाची विद्यार्थी संघटना समाजवादी छात्र सभाच्या विमलेश यादव याने विजय मिळवला आहे.
गुरुवारी सकाळी नऊ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तामध्ये मतदानाला सुरुवात झाली. पाच तास चालेलं हे मतदान दुपारी दोन वाजता संपलं. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी मतदान करावं म्हणून दोन्हीकडील कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसले. दुपारी दोन वाजेपर्यंत ४७.३८ टक्के मतदान झालं. या निवडणुकीमध्ये एकूण चार हजार २९४ विद्यार्थ्यांनी मतदान केलं. यामध्ये दोन हजार ८६६ विद्यार्थी आणि एक हजार ४२८ विद्यार्थीनींचा समावेश होता. एकूण मतदारांची संख्या नऊ हजार ६२ इतकी आहे.
वाराणसी हा सुरुवातीपासूनच भाजप आणि आरएसएसचा गड मानला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातूनच लोकसभेवर गेले आहेत. वाराणसी हे हिंदू धर्मियांचं श्रद्धास्थान आहे. त्यामुळे इथं सातत्यानं भाजपला फायदा मिळतो. असं असतानाही भाजपचीच विद्यार्थी संघटना असलेल्या अभाविपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. महात्मा गांधी काशी विद्यापीठ छात्र संघाच्या चारही पॅनलपैकी एकही जागा अभाविपला मिळालेली नाही.वाराणसीतील या निकालामुळे आता काँग्रेस आणि समाजवादी पक्षात उत्साह संचारला आहे.