मुक्तपीठ टीम
महिला व बालविकास विभागात अंगणवाडी सेविकांचे मोठे योगदान आहे. अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढ व इतर मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक असून लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
मंत्रालयातील दालनात एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मानधनाबाबत आयोजित बैठकीत महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपसचिव वि. रा. ठाकुर, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम.ए.पाटील, दिलीप उटाणे, आरमाइर इराणी, अतुल दिघे, राजेश सिंग, संगीता कांबळे, दत्ता देशमुख यावेळी उपस्थित होते.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, राज्यातील एक लाख १०हजार अंगणवाड्यांच्या माध्यमातून राज्यातील बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढ तसेच विविध प्रश्नांबाबत शासन संवेदनशील आहे.मानधन वाढीचा निर्णय हा धोरणात्मक निर्णय आहे याबाबतीत विभागाने प्रस्ताव पाठवावा त्यावर मंत्रिमंडळात निर्णय घेऊ, असेही त्यांनी सांगितले.