मुक्तपीठ टीम
देशात इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही आता जनावरांमध्ये लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वेगाने पसरतोय. एकट्या महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांमध्ये गाई आणि बैलांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. महाराष्ट्राचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी मंगळवारी सांगितले की, आजपर्यंत २२ जिल्ह्यांतील एकूण ३९६ गावांमध्ये या रोगाची प्रकरणे आढळून आली आहेत. जनावरांच्या या धोकादायक विषाणूच्या संसर्गामुळे आतापर्यंत एकूण ५६ संक्रमित जनावरांचा मृत्यू झाला आहे.
ठाण्यात १४ जनावरांना या आजाराची लागण
- महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील किमान १४ जनावरांमध्ये लम्पी रोग (एलएसडी) आढळून आला आहे.
- ठाणे जिल्हा दंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा ‘कंटेन्ड झोन’ घोषित केला आहे आणि विषाणूचा पुढील प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यातून जनावरांच्या हालचालींवर बंदी घातली आहे.
- अंबरनाथ, शाहपूर आणि भिवंडी भागात हा आजार आढळून आला आहे.
- ठाणे जिल्हा परिषदेने एलएसडी प्रतिबंधक लसीच्या १० हजार डोसची मागणी केली असून आतापर्यंत तीन तालुक्यांमध्ये ५ हजार १७ गुरांना लसीकरण करण्यात आले आहे.
नांदेड प्रशासनाने जनावरांच्या बाजारावर बंदी घातली…
- जनावरांमध्ये पसरणाऱ्या या आजाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील नांदेड जिल्हा प्रशासनाने जनावरांचे बाजार भरण्यास बंदी घातली आहे.
- नांदेडचे जिल्हा दंडाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनीही पुढील आदेशापर्यंत गुरे एकमेकांत मिसळण्यास बंदी घातली आहे.
जिल्ह्यात जनावरांच्या शर्यतीही भरवता येत नाहीत.