मुक्तपीठ टीम
आदरणीय स्मृतीशेष केशव सिताराम ठाकरे (प्रबोधनकार ठाकरे) यांचा जन्म दिवस १७ सप्टेंबर १८८५ ला झाला होता म्हणुन १७ सप्टेंबर २०२२ हा संपूर्ण भारतभर “लोक प्रबोधन दिन” म्हणून यावर्षी पासून साजरा करण्यात येणार आहे असे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड मनोज आखरे यांनी जाहिर आवाहनाद्वारे सांगितले.
प्रबोधनकार ठाकरे यांनी १६ ऑक्टोंबर १९२१ रोजी “प्रबोधन” या पाक्षीकाचे प्रकाशन सुरू केले. त्यातुन त्यांनी आपल्या प्रखर सत्यवादी लेखणीतून महाराष्ट्राची वैचारीक मशागत केली. त्यांना प्रबोधनकार म्हणुन ओळख प्राप्त झाली. विषमतेच्या विरोधात सत्यशोधक बाण्याने निर्भिडपणे लोकांच्या बाजुने उभे राहणारे सन्माननिय केशव सिताराम ठाकरे हे खरे प्रबोधनकार होते.
त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने तथागत गौतम बौध्द ते जिजाऊ-शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर, संविधान या क्रांतिविचांराचा जागर व्हावा म्हणुन प्रबोधनकारांचा जन्मदिवस महाराष्ट्रभर लोकप्रबोधन दिन म्हणुन भव्य प्रमाणात साजरा करण्यात येत आहे.
प्रबोधनकारांनी धार्मिक अंधश्रध्दा, अनिष्ट रूढी-परंपरा पुरोहितशाही भांडवलशाही या विरूध्द आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण, प्रबोधन, शेतकरी, कामगार इत्यादी प्रश्नांसाठी आंदोलने केली. त्यांचे हे कार्य अतुलनिय आहे महाराष्ट्राचे हित व लोकहित यात त्यांनी कधीही तडजोड केली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी अत्यंत हिरीरीने भाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राची अस्मिता ही त्यांची प्रेरणा होती सतत भ्रमंती प्रबोधन, लेखन, भाषण, आंदोलने कृतिशील विचार व आचरण यातुन त्यांचे वेगळपण लक्षात येते.
प्रबोधनकारांनी सत्यशोधक परंपरा चालवत मांडलेला विचार व संघर्ष अजून संपलेला नाही. शेतकरी, बेरोजगार, युवक-युवती, कामगार, आदिवासी, शोषित यांचे प्रश्न कायम आहेत. वर्तमानात लोकशाहीच्या नावावर हुकुमशाही लादल्या जात आहे. म्हणुन भारताचे संविधान व लोकशाही अबाधित राहण्यासाठी लोकप्रबोधनाची अत्यंत गरज आहे. म्हणुन १७ सप्टेंबर हा प्रबोधनकारांचा जन्मदिवस हा लोकप्रबोधन दिन म्हणुन सर्वत्र उत्साहाने आयोजित केला जाणार आहे. प्रबोधनकारांच्या विचारांचा हा जागर अविरत राहिला पाहिजे यासाठीच हा अट्टाहास.
सौरभ खेडेकर महासचिव
अॅड. मनोज आखरे