मुक्तपीठ टीम
पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे गेल्या काही दिवसांपासून पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने लोकांना स्थलांतर व्हावे लागले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशावेळी पाकिस्तानी पूरग्रस्तांना हिंदूंचा देव पावला आहे. पाकिस्तानातील सिंध, पंजाब आणि बलुचिस्तान प्रांतातील पूरस्थितीमुळे तिथल्या मुस्लिमांना हिंदूंच्या मंदिरात आश्रय देण्यात आला आहे.
मुस्लिमांना मंदिरात आश्रय!!
- बलुचिस्तान प्रांतातील कच्छी जिल्ह्यातील छोट्या जलाल खान गावातील हे मंदिर काही उंचीवर बांधले आहे, त्यामुळे येथे पुराचे पाणी शिरले नाही.
- मंदिर प्रशासनाने सर्व लोकांसाठी, बहुतेक मुस्लिमांसाठी दरवाजे उघडले आहेत.
- १०० खोल्यांच्या बाबा माधोदास मंदिरात पूरग्रस्तांना केवळ सुरक्षित आश्रय दिला नाही तर मोफत भोजनही दिले जात आहे. पूरग्रस्तांव्यतिरिक्त त्यांच्या जनावरांनाही येथे आश्रय देण्यात आला आहे.
- सुमारे २०० ते ३०० पूरग्रस्त मंदिरात आश्रयास आहेत, ज्यांना सन्मानाने दररोज जेवण आणि नाश्ता दिला जात आहे.
- या भागातील नारी, बोलन आणि लाहिरी नद्यांना आलेल्या पुरामुळे या गावाचा संपूर्ण प्रांतापासून संपर्क तुटला आहे.
वैद्यकीय शिबिराचेही आयोजन!!
- जलाल खानमधील बहुसंख्य हिंदू समुदाय रोजगार आणि इतर संधींसाठी कच्छीतील इतर शहरांमध्ये स्थलांतरित झाला आहे.
- या मंदिराची देखभाल करण्यासाठी काही कुटुंबे या संकुलात राहतात.
- रतन कुमार (५५) हे तहसीलचे दुकानदार सध्या मंदिराचा कारभार पाहत आहेत.
- डॉक्टर इसरार मुघेरी यांनी मंदिरात वैद्यकीय शिबिर लावले आहे.
- मुस्लिमांनी मंदिरात आश्रय घ्यावा यासाठी हिंदूंकडून लाऊडस्पीकरवरून घोषणा देण्यात आल्या.