मुक्तपीठ टीम
भाजपा २०२४ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी आतापासूनच अतोनात प्रयत्न करत आहे. आतापर्यंत इतर सर्व समाजांमधील मतदारांवर लक्ष देणाऱ्या भाजपाने आता मुसलमान मतदारांकडेही लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने मुसलमानांमधील पसमंदा वर्गावर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. भारतातील मुसलमानांमधील ८५ टक्के लोकसंख्या मागास असून त्यांना पसंमदा म्हटलं जातं. आता भाजपानं त्यांची मनं जिंकत मतं मिळवण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे.
हैदराबादच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठरलं लक्ष्य
- दराबादच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी सामाजिक समीकरणे शोधण्यासोबतच पसमांदा मुस्लिमांवर भर देण्याची आवश्यकता व्यक्त केली.
- त्यानंतर त्यांचा भरणा जास्त असलेल्या उत्तरप्रदेशात त्यासाठी खास प्रयत्न केले जाणार आहेत.
पसमंदा मुसलमान म्हणजे कोण?
- पसमंदा मुस्लिम हा भारतातील मुस्लिम समाजातील दुर्बल घटक आहे.
- भारतीय समाजातील इतर घटकांप्रमाणेच जातिव्यवस्था मुसलमानांमध्येही आहे.
- भारतीय मुस्लिमांपैकी १५ टक्के लोकांना उच्चवर्गीय किंवा उच्चवर्णीय मानले जाते,
- या उच्चवर्णीय मुस्लिमांना अश्रफ म्हणतात.
- या व्यतिरिक्त मुस्लिमांमधील उर्वरित ८५ टक्के अरझल आणि अजलफ हे दलित आणि मागासलेले मानले जातात.
- मुस्लिम समाजात त्यांची स्थिती फारशी चांगली नाही. मुस्लिम समाजातील उच्च वर्ग त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतो, ते आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सर्वच बाबतीत मागासलेले आहेत.
- या मागास वर्गाला भारतात पसमंदा मुस्लिम म्हणतात.
पसमंदा मुस्लिमांचं राजकारणात स्थान
- पूर्वी भारतीय राजकीय पक्षांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले होते.
- आतापर्यंत काँग्रेस, बसपा, सपा आणि इतर पक्षांमध्ये श्रीमंत मुस्लिमांचे राजकीय वर्चस्व राहिले आहे.
- सध्या भाजपाविरोधातील पक्ष पुढील सार्वत्रिक निवडणुकीत आपला मताधिक्य वाढवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत.
- त्यामुळे भाजपानेही केवळ हिंदू मतांवर अवलंबून राहण्याऐवजी मुस्लिम मतांकडे लक्ष देण्याची रणनीती ठरवली आहे.
- त्यासाठी भारतीय राजकारणात दुर्लक्षित पसमंदा मुस्लिमांना भाजपमध्ये महत्त्व देत आपल्याशी जोडण्याची प्रयत्न केला जात आहे.