मुक्तपीठ टीम
भाजपाने आगमी निवडणुकांसाठी आखलेली रणनीती ही ब्रँड मोदीच्या बळावरच मतदारांना साकडं घालण्याची दिसत आहे. कारण यापुढील निवडणुकांमध्ये राज्यांमधील नेत्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या नावावर नाही तर फक्त आणि फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरच मत मागण्यात येणार आहेत.
भाजपाचा का मोदींवरच भर?
- भाजपा हा पक्ष सर्वेक्षण, डेटा विश्लेषणावर काम करत असतो.
- त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे राजकीय रणनीती ठरवली जाते.
- काही दिवसांपूर्वी केलेल्या अशाच एका सर्वेक्षणात भाजपचे बहुतांश मुख्यमंत्री फारसे लोकप्रिय नसल्याचे दिसून आले आहे.
- २०२४ पूर्वी होणाऱ्या निवडणुकांमध्ये राज्यांमधील सत्ता टिकवण्यासाठी पक्षाला पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि केंद्राच्या कल्याणकारी योजनांवर अवलंबून राहावे लागेल, असा निष्कर्ष काढला गेला.
- त्यामुळेच आता मते मागताना भाजपा मोदींचाच ब्रँड वापरणार आहे.
जिथं आहे संकट, तिथं मोदींसोबत स्थानिक मिनी ब्रँडही!
- अर्थात सर्वच राज्यांमध्ये फक्त मोदी या एकाच मेगाब्रँडवर भर दिला जाणार नाही.
- काही राज्यांमध्ये जिथं मोदी युगातही भाजपा लोकप्रियता मिळवू शकलेली नाही, किंवा सत्तेनंतर संकटात आली आहे, तिथं वेगळी रणनीती असेल.
- अशा राज्यांमध्ये मोदींच्या मेगाब्रँडसोबतच स्थानिक जातीय, धार्मिक समीकरणं लक्षात घेत त्या वर्गात लोकप्रिय असणारे काही स्थानिक मिनी ब्रँडही वापरले जातील.
- त्यामुळेच नियम मोडत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांचा ७९ वर्षीय असूनही संसदीय मंडळात समावेश करण्यात आला आहे.
- पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि २०२४च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कर्नाटकात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर या लिंगायत नेत्याचा पूर्ण पाठिंबा महत्त्वाचा आहे.
- भाजपाने पंजाबमध्ये शीख नेते इक्बाल सिंग लालपुरा आणि मध्य प्रदेशात दलित चेहरा सत्यनारायण जातिया यांची निवड केली.