मुक्तपीठ टीम
वंदेमातरम संघटना कृत युवा वाद्य पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक आणि शिववर्धन वाद्य पथक यांच्या वतीने महाराष्ट्रातील ७० ढोल-ताशा पथकांचे अभिनव वाद्य पूजन सोहळा व डॉ. प्रभा अत्रे यांची संगीत सेवेबद्दल कृतज्ञता ग्रंथतुला करण्यात आली. ग्रंथतुलेतील पुस्तके कारगिल मधील हुंदरमन गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने उभारण्यात येत असलेल्या ग्रंथालयाला दिली जाणार आहेत.
“आपल्याला जी गोष्ट आवडते, ती मनापासून आणि प्रामाणिकपणाने केली, तर त्यात आपण यशस्वी होतो. कामातील स्पष्टता, सातत्य, नाविन्यता प्रगल्भतेकडे घेऊन जाते. त्यामुळे जे जे आवडते ते ते पारखून घेऊन त्यात उत्कृष्ट देण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे,” अशी भावना प्रख्यात गायिका, स्वरयोगिनी पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी प्रसाद भारदे यांनी डॉ. प्रभा अत्रे यांची मुलाखत घेतली. शास्त्रीय संगीत, त्यातील विविध राग, हरकती, बंदिशी, कायदे, घराणे याविषयी प्रभाताईंनी मनमोकळा संवाद साधला. बाजीराव रस्त्यावरील नूमवि प्रशालेत रंगलेल्या या सोहळ्याप्रसंगी डॉ. सतीश देसाई, दीपक मानकर, प्रसाद भडसावळे, वंदेमातरम संघटनेचे वैभव वाघ, सचिन जामगे, ॲड. अनिश पाडेकर, अक्षय बलकवडे, शिरीष मोहिते, अमित रानडे यांच्यासह विविध पथकांचे प्रमुख उपस्थित होते.
डॉ. प्रभा अत्रे म्हणाल्या, “श्रोत्यांची दाद कलाकारांना वाढवते. श्रोता असेल तर कलाकार मोठा होतो. माझे गाणे शेवटपर्यंत राहावे, हीच माझी इच्छा आहे. आज इथे एवढी तरुण मंडळी पाहून मलाही तरुण झाल्यासारखे वाटते. या नव्या पिढीला शास्त्रीय संगीताची गोडी लावण्यासाठी त्याकडे कला म्हणून पाहायला हवे. आज संगीत साधनेऐवजी मनोरंजनाकडे अधिक झुकले आहे. आपल्या गायनात स्पष्टता, रियाज आणि सखोल अभ्यास हवा. रात्रीच्या वेळी मुलांना शास्त्रीय संगीत, संस्कार ऐकायला लावले पाहिजे.”