मुक्तपीठ टीम
आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या अडचणी वाढत आहे. अबकारी धोरण प्रकरणातील सीबीआयच्या छाप्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनीष सिसोदिया यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या छापेमारीनंतर ईडीला या प्रकरणाची फाईल देण्यात आली होती. ईडीने त्याचा आधार घेत मनी लाँड्रिग प्रकरणी मनीष सिसोदिया यांच्याविरोधात गुन्हा नोंदवल्याची माहिती आहे.
सीबीआयद्वारे मनीष सिसोदियाशी संबंधित कागदपत्रे ईडीकडे सुपूर्द केल्यानंतरच गुन्हा नोंदवण्याची तयारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्लीच्या उत्पादन शुल्क धोरणातील अनियमिततेप्रकरणी सीबीआयने शुक्रवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानावर छापा टाकला. या प्रकरणासंदर्भात नोंदवलेल्या सीबीआय एफआयआरमधील १५ नावांच्या यादीत सिसोदिया यांचेही नाव होते.सीबीआयने शुक्रवारी ३१ ठिकाणी छापे टाकले होते.
मनीष सिसोदियांवर कोणते आरोप?
- सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावर सरकारी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.
- यासोबतच एलजीच्या परवानगीशिवाय मद्य उत्पादकांना लाभ देणे, दारू विक्रेत्यांचे ईएमडी परत करणे आणि एल१, एल७ परवाने देणे या प्रक्रियेत घोटाळा केल्याचा आरोप आहे.
- यासोबतच केन बीअर पॉलिसीमध्ये गडबड झाल्याचा आरोप होत आहे.