मुक्तपीठ टीम
गेल्या दोन वर्षांनंतर यंदाचे सर्व सण निर्बंधमुक्त आणि उत्साहात साजरे करता येणार असल्याची घोषणा शिंदे-फडणवीस सरकारने केली. त्यानुसार यंदाची दहीहंडी धुमधडाक्यात साजरी करण्यात आली. अनेक बड्या नेत्यांनी दहीहंडीचं आयोजन केलं होतं. दहीहंडीच्या जल्लोषादरम्यान, अनेक गोविंदा जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यापैकीच एक अवघ्या २२ वर्षांच्या गोविंदा संदेश दळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. संदेश दळवी हा शिव शंभो गोविंदा पथकाचा गोविंदा होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी झालेली घटना दुर्दैवी असल्याचं म्हणत, संदेश दळवी याच्या कुटुंबियांना १० लाखांची मदत जाहीर केली आहे.
संदेश दळवीची मृत्यूशी झुंज अपयशी!!
- दहिहंडीमध्ये जखमी झालेल्या मुंबईतील संदेश दळवीचा मृत्यू झाला आहे.
- संदेशच्या डोक्याला इजा झाली होती.
- रविवारी त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
- डोक्याची शस्रक्रिया झाली होती, पण गंभीर दुखापत झाल्यानं संदेश दळवीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
- संदेश दळवीचा रुग्णालयातील एक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
- शिवसेनेचे पदाधिकारी जितेंद्र जनावणे यांनी उपचारासाठी मदत केली असल्याचं त्यामध्ये दिसून येतं.
- दुसरीकडे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रविण दरेकर यांनी संदेश दळवीच्या कुटुंबाला मदत केली जाईल, असं म्हटलं.
संदेशच्या पथकातील आणखी एक तरुणही जखमी!!
- संदेश अवघ्या २२ वर्षांचा होता.
- घरामध्ये आई-वडील आणि आपल्या भावंडांसह तो राहत होता.
- संदेश सर्वात लहान होता.
- संदेश दळवी हा मूळचा विले पार्ले येथील असून काही दिवसांपूर्वी त्याचं कुटुंब कुर्ला येथे राहायला गेले होते.
- संदेश हा विलेपार्ले पूर्वेकडील शिवशंभो गोविंदा पथकात सामील होता.
- हे पथक शुक्रवारी रात्री विलेपार्ले पूर्वेकडील बामनवाडा भागात दहीहंडी फोडण्यासाठी गेले होते.
- यावेळी दहीहंडीच्या सर्वात वरील सातव्या थरावरून कोसळून संदेश जखमी झाला होता.
- त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.
- मंडळाच्या तरुणांनी त्याला तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल केले होते.
- मात्र त्याची तब्येत सुधारत नसल्याने रविवारी दुपारी त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
- उपचारादरम्यान सोमवारी रात्री ९ वाजता संदेशचे निधन झाले.
- यावेळी विनय शशिकांत रांबाडे (वय २० वर्ष) संदेश प्रकाश दळवी, वय २२ वर्षे हे दोघेजण दहीहंडी फोडत असताना खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
- विनयवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.