मुक्तपीठ टीम
लाऊडस्पीकरवर ‘अजान’ दिल्याने इतर धर्माच्या लोकांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होत नाही, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने म्हटले आहे. मशिदींना लाऊडस्पीकरवर अजान देण्यास मनाई करणारा आदेश पारित करण्यास न्यायालयाने नकार दिला. न्यायालयाने अधिकाऱ्यांना लाऊडस्पीकरशी संबंधित ‘ध्वनी प्रदूषण नियम’ लागू करण्याचे आणि अनुपालन अहवाल दाखल करण्याचे निर्देश दिले.
प्रभारी मुख्य न्यायाधीश आलोक आराधे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने बंगळुरूचे रहिवासी मंजुनाथ एस. हलावर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी झाली. याचिकेत म्हटले होते की, अजान ही मुस्लिमांची अत्यावश्यक धार्मिक प्रथा आहे. मात्र, अजानचा आवाज इतर धर्माचे पालन करणाऱ्यांना त्रास देतो.
धर्माचा मुक्तपणे प्रचार आणि प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार!!
- धर्माचा प्रचार करण्याचा मूलभूत अधिकार
- न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, भारतीय राज्यघटनेच्या कलम २५ आणि २६ मध्ये सहिष्णुतेच्या तत्त्वाला मूर्त रूप दिले आहे, जे भारतीय सभ्यतेचे वैशिष्ट्य आहे.
- घटनेचे कलम २५(१) लोकांना त्यांच्या धर्माचा मुक्तपणे प्रचार आणि प्रसार करण्याचा मूलभूत अधिकार प्रदान करते.
- मात्र, हा पूर्ण अधिकार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
- सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता आणि आरोग्याच्या बाबतीत भारतीय राज्यघटनेच्या भाग ३ च्या इतर तरतुदींनुसार ते निर्बंधांच्या अधीन आहे.
- अजानचा आवाज इतर धर्माच्या लोकांना मिळणाऱ्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन करतो हा युक्तिवाद मान्य करता येणार नाही.