सोलापूरमधील परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांनी भारताचा झेंडा जगात फडकावला आहे. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा जागतिक स्तरावरचा सर्वोत्कृष्ट शिक्षक पुरस्कारासाठी रणजीतसिंह डिसले यांचे नाव जाहीर झाले आहे. सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.
क्यूआर कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राच नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार रणजीतसिंह यांना जाहीर करण्यात आला आहे.
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात जगभरातील १४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून विजेता म्हणून रणजीतसिंह डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
डिसले यांच्या नावाच्या घोषणेनंतर ते म्हणाले की, पुरस्कारच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम नामांकनामधील ९ शिक्षकांना देण्याचे जाहीर केले. असे केल्याने ९ देशातील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल, असे त्यांनी सांगितले. तसेच त्यांना मिळणारी रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंडाकरता वापरणार असल्याचे त्यांनी पुढे म्हंटले.