मुक्तपीठ टीम
रायगड जिल्ह्यात हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळून आलीय. सुरुवातीला ही बोट स्थानिक मच्छिमारांची असल्याचा संशय व्यक्त केला गेला होता, परंतु ती आता ओमान सिक्युरिटीची बोट असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सापडलेली बोट दहशतवादी, समाजकंटकांची नाही. नेप्चुन मेरीटाईम सेक्युरिटी लिमिटेड कंपनीची बोट असल्याची माहिती समोर आली आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
आता बोटीबद्दल माहिती उघड झाली असली तरी पोलीस दक्षता घेत आहेत. बोटीत शस्त्रास्त्र आढळून आल्यामुळे जिल्ह्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे व पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आली आहे. एवढंच नव्ह तर, जिल्ह्यात नाकाबंदीही करण्यात आली. प्रत्येक वाहनाची कसून चौकशी होत आहे.
तपासामध्ये पोलिसांना AK 47 बंदुकीसह काही काडतुसं बोटीत सापडली आहेत. मात्र अद्याप अधिकृत माहिती याबाबत देण्यात आलेली नाही. रायफल्स डमी आहेत की ओरिजनल याचा शोध पोलिसांकडून सुरु आहे. त्या स्पीड बोटमध्ये कोणतीही व्यक्ती सापडली नाही. एटीएस प्रमुख विनीत अग्रवालांसह एटीएस पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.
दरम्यान, आपली बोट भरकटली होती , असा दावा नेप्चुन मेरीटाईम सेक्युरिटी लिमिटेड कंपनीने केला आहे.
एके-४७वाल्या बोटीच्या मालक कंपनीची भूमिका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवेदन
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी विधानसभेत माहिती दिली.
स्थानिक मच्छिमारांनी कळवल्यानंतर पोलिसांनी बोटीची तपासणी केली. पोलिसांना बोटीत तीन एके-४७ आणि दारुगोळा सापडला आहे. या बोटीचे नाव लेडी हान आहे. ती हाना लॉंडर्सगन या ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची आहे. तिचे पती जेम्स हार्बट हे कप्तान आहेत. बोटीचे इंजिन निकामी झाले, एका कोरियन युद्ध नौकेने बोटीवरील कर्मचाऱ्यांची सुटका केली आणि ओमानला सोडले. ती नौका वादळातून भारतीय किनाऱ्यावर लागली आहे. तरीही पोलीस, दहशतवाद विरोधी पथक या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. केंद्रीय यंत्रणांनाही कळवले आहे.