मुक्तपीठ टीम
बंडखोरीनंतर पक्ष वाचवण्यासाठी लढणाऱ्या शिवसेनेने भाजपावर कडवट टीका केली आहे. कार्यकारी संपादक संजय राऊत ईडीच्या अटकेनंतर आता तुरुंगात असतानाही दैनिक सामनाची धार बोथट झालेली नाही. उलट अधिकच धारदार झाली आहे. गेले काही दिवस दैनिक सामनाचे संपादकीय लेख अधिकच आक्रमक शैलीत दिसत आहेत. गुरुवारच्या संपादकीयातही भाजपावर कडवट टीका करण्यात आली आहे.
अग्निवीरांच्या अपमानावर आसूड ओढण्यात आले आहेत. “जिथं तिरंगा फडकावायचा तिथं हातभर शेपटा, आपल्याच मोहल्ल्यात तिरंगा यात्रा”, अशा शब्दात फटकारलं आहे.
दैनिक सामनाचं संपादकीय जसं आहे तसं…
भाजपाकडून दुसरी काय अपेक्षा करायची?
- आझादीच्या अमृत महोत्सवाचा राजकीय उत्सव संपला असेल तर सरकारने देशाच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवे.
- लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी बरेच काही बोलून गेले.
- त्यांचे भाषण राजकीय प्रचारकी थाटाचे होते.
- २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची तयारी त्यांनी लाल किल्ल्यावरून केली.
- पंतप्रधानांचे भाषण संपले आणि इकडे महाराष्ट्रात ‘अग्निवीर’ योजनेची पोलखोल झाली.
- संभाजीनगरात अग्निवीर भरतीसाठी हजारो बेरोजगार तरुण आले.
- त्यांना दिवस-रात्र अन्न-पाण्याशिवाय तळमळत रस्त्यावरच राहावे लागले.
- ‘अग्निवीर’ हे आपल्या देशाचे भाग्यविधाते, राष्ट्रसेवक वगैरे असल्याचे पंतप्रधानांकडून सांगण्यात येत होते.
- प्रत्यक्षात अग्निवीरांची अवस्था भिकाऱ्याहून भिकाऱ्यासारखी केल्याचे महाराष्ट्रात पाहायला मिळाले.
- विकसित हिंदुस्थानसाठी हेच पंचप्राण असतील तर कसे व्हायचे?
- बेरोजगार तरुणांची सैन्यभरतीच्या नावाखाली अशी थट्टा जगाच्या पाठीवर कोठेच झाली नसेल.
- मुळात बेरोजगारांना गुलाम व लाचार बनविण्यासाठी ‘अग्निवीर’ ही योजना आहे व महाराष्ट्रात याचे बिंग फुटले.
- अग्निवीर भरतीसाठी आलेल्या तरुणांना कोणी साधे पाणीही विचारले नाही.
- पण झुंडीच्या झुंडी गोळा करून त्यांना भ्रमित करायचे, धर्माची अफू त्यांच्या डोक्यात कोंबायची व त्याच नशेत ठेवून निवडणुका जिंकायच्या हेच ज्यांचे ‘पंचप्राण’ आहेत, त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करायची?
तुम्ही स्वातंत्र्याचा इतिहास का बदलत आहात?
- महाराष्ट्रात महाप्रलयाने थैमान घातले.
- लोकांचे संसार वाहून गेले.
- पण फक्त ‘वंदे मातरम्’ म्हणा, महाप्रलय संपून जाईल, अशा बेताल राष्ट्रभक्तीने लोकांचे जगण्या-मरणाचे प्रश्न संपणार आहेत काय
- भाजपच्या मंत्र्यांनी अशा प्रकारे ‘वंदे मातरम्’चा फतवा काढून राजकारण करणे हा स्वातंत्र्य आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या शेकडो क्रांतिवीरांचा अपमान आहे.
- पंतप्रधानांपासून भाजपच्या आजच्या पिढीपर्यंत एकही जण स्वातंत्र्य आंदोलनात नव्हता.
- हे सत्य पंतप्रधान मोदी यांनीच लाल किल्ल्यावरून मान्य केले.
- स्वातंत्र्यानंतर जन्मास आलेला मी पंतप्रधान असल्याचे ते म्हणतात.
- मग तुम्ही स्वातंत्र्याचा इतिहास का बदलत आहात?
- भारतीय जनता पक्षाला हा अधिकार दिला कोणी?
घर घर तिरंग्याचे राजकीय ढोंग कशासाठी?
- ‘घर घर तिरंगा’ वगैरे राजकीय मोहिमा ठीक आहेत, पण देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपल्या कार्यालयांवर व घरांवर तिरंगा फडकविण्यास नकार देणारे आज ‘घर घर तिरंग्या’च्या मोहिमा राबवताना दिसले.
- हे आश्चर्यच नाही काय? ‘घर घर तिरंगा’ फडकवायची इतकीच देशभक्ती व मर्दानगी होती तर पाकव्याप्त कश्मीरमधील घराघरावर तिरंगा फडकवून आझादीचा अमृत महोत्सव हिमतीने साजरा करायला हवा होता.
- निदान संपूर्ण कश्मीर खोऱ्यात तरी सध्याचे सरकार ‘घर घर तिरंगा’ फडकवू शकले काय?
- आझादीचा अमृत महोत्सव लाल किल्ल्यावर सुरू असताना तिकडे कश्मीरात दोन कश्मिरी पंडितांवर प्राणघातक हल्ले झाले.
त्यात एक पंडित मरण पावला. - आपल्याच बांधवांचे, खास करून हिंदू पंडितांचे रक्ताचे सडे पडत असताना घर घर तिरंग्याचे राजकीय ढोंग कशासाठी?
- कश्मीर खोऱ्यात गेल्या आठ दिवसांत सहा लष्करी जवानांना मरण पत्करावे लागले.
- त्यावर महाराष्ट्रातील भंपक ‘वंदे मातरम्’वाल्यांनी एखादा उसासा तरी सोडला काय?
- तिरंग्याची शान राहणार असेल तर तो डौलाने फडकवा.
- रोज तिरंगा कोठे ना कोठे तरी आमच्याच रक्ताने भिजतोय.
- तिकडे लडाखातील गलवान व्हॅलीत पेंगॉन्ग लेकपर्यंत चीनची रेड आर्मी आमच्या हद्दीत घुसली.
- आमच्या ४० हजार वर्ग मैल जमिनीचा ताबा घेऊन ते ठाण मांडून बसले.
- तिकडे शेपटी घालणारे इकडे ‘वंदे मातरम्’ आणि ‘घर घर तिरंगा’च्या घोषणा करतात.
- गलवान व्हॅलीत चिन्यांनी गिळलेल्या जमिनीवर आमचे भाजप पुढारी किंवा केंद्र सरकारातील एखादे हिंमतवाला मंत्री तिरंगा फडकवयाला गेले असते तर त्यांना संपूर्ण देशाने अभिवादन केले असते.
- पण ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम् म्हणा’, ‘घर घर तिरंगा लावा’ असे फतवे काढायचे व राष्ट्रभक्तीचे बुडबुडे पडायचे हाच यांचा आझादी उत्सव.
- त्यात अमृतापेक्षा राजकीय सूडबुद्धीचेच जहर जास्त आहे.
घराणेशाहीपेक्षा एक-दोन लोकांची एकाधिकारशाही अधिक घातक !!
- पंतप्रधानांनी आपल्या भाषणात भ्रष्टाचार व घराणेशाहीवर घणाघात केला, पण गेली नऊ वर्षे आपलेच राज्य
- आहे! आपण आपल्या उद्योजक मित्रपरिवाराचे १० लाख कोटींचे बँक कर्ज माफ केले.
- यास नक्की काय म्हणावे?
- इकडे तुमचे ‘ईडी-पिडी’ राजकीय विरोधकांना चवली-पावलीच्या व्यवहारांत पकडून तुरुंगात डांबत आहेत.
- मग हे कर्जमाफीचे काय प्रकरण आहे?
- कोण कोणाच्या बाजूने आहे यावर तुमच्या राष्ट्रभक्तीच्या व भ्रष्टाचाराच्या व्याख्या ठरणार असतील तर हा देश अंधाराच्या खोल गर्तेत ढकलला जात आहे.
- १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून घराणेशाहीवर हल्लाबोल झाला, पण घराणेशाहीपेक्षा एक-दोन लोकांची एकाधिकारशाही अधिक घातक ठरते.
- सध्या तेच घडत आहे.
- देशावर व महाराष्ट्रावर अशाच टोळ्यांचे राज्य आणून स्वातंत्र्य व लोकशाहीला बटिक बनवले गेले.
- कोणत्या घराणेशाहीची बात आपण करता?
- ठाकऱ्यांच्या घराणेशाहीवर कालपर्यंत तुमच्या सत्तेचा डोलारा उभा होता.
- ओडिशात नवीन पटनायक, आंध्रात जगन मोहन रेड्डी आणि कालपर्यंत बिहारचे पासवान, अशा अनेक घराणेशाह्यांनी तुमच्या सत्तेच्या तंबूस टेकू दिले व तुम्ही घेतले, पण सध्याच्या केंद्र सरकारला विस्मृतीचा झटका आला आहे.
- अगदी महाराष्ट्रात विखे-पाटलांची घराणेशाही सध्या महसुलाची आमसुले चोखत बसली आहेच.
- बाकी यादी द्यायचीच तर ती लांबतच जाईल व तुमचेच पंचप्राण कंठाशी येतील.
- मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू, इंदिरा गांधी अशी स्वातंत्र्यसमरातील घराणेशाही तुमच्याकडे असेल तर दाखवा.
- प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे अशी महाराष्ट्र स्वाभिमानाची तरी घराणेशाही तुम्ही दाखवू शकता काय?
राष्ट्रभक्तीचा असा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस!!
- लोकांना देशभक्तीच्या नावाखाली रस्त्यावर भिकाऱ्यासारखे उभे करायचे.
- एकीकडे अग्निवीर अग्निवीर म्हणून बेरोजगार तरुणांना राष्ट्रसेवक वगैरे म्हणायचे आणि दुसरीकडे ते भरतीसाठी आले की, त्यांचा अपमान करायचा.
- उपाशी-तापाशी लोकांना ‘वंदे मातरम्’चे नारे द्यायला लावायचे.
- हे धंदे बंद करा.
- बेकायदेशीर, घटनाद्रोही कृत्यांची लाज बाळगा.
- जिथे तिरंगा फडकवायचा तिथे हातभर शेपटा घालून आपल्या मोहल्ल्यांत तिरंगा यात्रा काढायच्या हे ढोंग आहे.
- राष्ट्रभक्तीचा असा व्यापार म्हणजे बेशरमपणाचा कळस आहे.