मुक्तपीठ टीम
भाजपाची साथ सोडत जेडीयूचे नितीश कुमार यांनी आज आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नितीश कुमार हे २००० साली पहिल्यांदा सात दिवसांसाठी मुख्यमंत्री झाले. आतापर्यंतच्या २२ वर्षांत त्यांनी एकूण आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. हा एक मोठा विक्रम आहे, कारण देशातील सर्वाधिक काळ काम करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनाही इतक्या वेळा शपथ घेता आलेली नाही.
२०००: नितीश पहिल्यांदा केवळ सात दिवसांसाठी मुख्यमंत्री
- ३ मार्च २००० रोजी नितीश कुमार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.
- मात्र, बहुमत नसल्यामुळे त्यांना १० मार्च २००० रोजी पदाचा राजीनामा द्यावा लागला.
- यानंतर २००५ मध्ये बिहारमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या पाठिंब्याने नितीश दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. २०१० च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने पुन्हा एकदा नितीश यांना मुख्यमंत्री केले.
२०१४: पराभवाची जबाबदारी स्वीकारून पद सोडले
- लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात पक्षाच्या खराब कामगिरीमुळे त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
- यावेळी त्यांनी जीतनराम मांझी यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवले.
- तथापि, २०१५ मध्ये, जेव्हा पक्षात अंतर्गत कलह सुरू झाला तेव्हा नितीश यांनी पुन्हा एकदा मांझींच्या जागी स्वतः मुख्यमंत्रीपद स्वीकारले.
२०१५: महाआघाडीसह विक्रमी विजय
- २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत NDA विरुद्ध महाआघाडी (JDU, RJD, काँग्रेस आणि डाव्या आघाडी) च्या विजयानंतर नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले. नितीश यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची ही पाचवी वेळ होती.
२०१७: तेजस्वीवर आरोप, महाआघाडी सोडून NDA मध्ये सामील
- आरजेडी आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नितीश कुमार यांनी महाआघाडीपासून काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी जुलै २०१७ मध्ये पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील झाले आणि मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली.
२०२०: जेडयू कडे कमी जागा, तरीही ते मुख्यमंत्री झाले
- २०२०च्या विधानसभा निवडणुकीत एनडीए आघाडीने बाजी मारली.
- मात्र, भाजपाच्या तुलनेत जेडयूच्या जागा लक्षणीयरीत्या कमी झाल्या.
- असे असतानाही नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
- मात्र, त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपामध्ये बराच काळ संभ्रमाची स्थिती होती.
- आता नितीश यांनी पुन्हा एकदा एनडीएपासून वेगळे होण्याची घोषणा करत राजीनामा दिला.
२०२२: महाआघाडीत परतले, आठव्यांदा मुख्यमंत्री झाले
- एनडीएची साथ सोडल्यानंतर नितीश कुमार यांनी आरजेडीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीत सामील होण्याची घोषणा केली.
- त्यामुळे नितीशकुमार यांनी आता आठव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
बाकीचे मुख्यमंत्री हा विक्रम का करू शकले नाहीत?
नितीश कुमार यांच्यानंतर सर्वाधिक मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम हिमाचल प्रदेशचे वीरभद्र सिंह आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री असलेल्या जयललिता यांच्या नावावर आहे.
१. वीरभद्र सिंह
- वीरभद्र सिंह हे सहा वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.
- वीरभद्र १९८३ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले.
- १९८५ मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक जिंकली आणि मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
- यानंतर वीरभद्र पुन्हा १९९३, १९९८, २००३ आणि २०१२ मध्ये हिमाचलचे मुख्यमंत्री बनले.
- २०१६ मध्ये भाजपाविरुद्धच्या पराभवामुळे त्यांच्या राजकीय कारकिर्दीला फुलस्टॉप लागला.
२. जे जयललिता
- सहा टर्म मुख्यमंत्र्यांमध्ये तामिळनाडूच्या जयललिता यांचेही नाव आहे.
- १९९१ मध्ये त्या पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या.
- त्यानंतर २००१ मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली आणि दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- मात्र, भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणामुळे त्यांना पायउतार व्हावे लागले.
- जयललिता यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी २००२ मध्येच आली, जेव्हा न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
- २००६ पर्यंत त्या मुख्यमंत्री होत्या.
- २०११ मध्ये त्यांनी पुन्हा एआयएडीएमकेला विजयाच्या उंबरठ्यावर नेले.
- २०१४ मध्ये त्यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणात पायउतार व्हावे लागले होते.
- मात्र, २०१५ मध्ये निर्दोष सुटल्यानंतर त्यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने विजय मिळवल्यानंतर जयललिता सहाव्यांदा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री बनल्या.
३. पवनकुमार चामलिंग
- सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांच्या नावावर भारतातील सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम आहे.
- चामलिंग यांनी १९९४, १९९९, २००४, २००९ आणि २०१४ मध्ये निवडणुका जिंकल्या आणि मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली.
- म्हणजेच २८ वर्षांच्या कारकिर्दीतही चामलिंग यांना केवळ पाच वेळा शपथ घेता आली.
४. ज्योती बसू
- त्याचप्रमाणे पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसुंच्या नावे विक्रम आहे.
- बसू १९७७ ते २००० पर्यंत सतत बंगालचे मुख्यमंत्री राहिले.
- यादरम्यान त्यांनी एकूण पाच वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
- त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नसल्याने त्यांच्याकडे शपथविधीची नोंद नाही.
सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री असणारे इतर नेते कोण?
सध्या पाच वेळा मुख्यमंत्री बनण्याचा विक्रम ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नावावर आहे, जे २००० मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते. २०१९ मध्ये बिजू जनता दलाने विजय मिळवल्यानंतर पटनायक यांनी पाचव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
त्याचप्रमाणे मिझोरामचे मुख्यमंत्री लाल थनहवला यांनीही पाच वेळा मिझोरामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. लाल थनहवला हे १९८४ ते १९८६, १९९९ ते १९९३, १९९३ ते १९९८, २००८ ते २०१३ आणि २०१३ ते २०१८ या पाच वेळा मुख्यमंत्री होते.
पंजाबचे प्रकाशसिंग बादल यांनीही पाच वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा विक्रम केला आहे. ते पहिल्यांदा १९७० ते १९७१ आणि नंतर १९७७ ते १९८० पर्यंत मुख्यमंत्री होते. यानंतर बादल यांनी १९९७ ते २००२ या काळात राज्याची धुरा सांभाळली. २००७ ते २०१२ आणि पुन्हा २०१२ ते २०१७ पर्यंत त्यांनी भाजपसोबत मुख्यमंत्रीपद भूषवले.
पाच वेळा मुख्यमंत्री बनलेल्या नेत्यांपैकी एक म्हणजे राजस्थानचे मुख्यमंत्री मोहन लाल सुखाडिया, जे वयाच्या ३८ व्या वर्षी मुख्यमंत्री झाले. त्यांचा पहिला टर्म १९५४ ते १९५७, नंतर १९५७ ते १९६२, १९६२ ते १९६७ आणि पाचवा टर्म १९६७ ते १९७१ असा होता.