मुक्तपीठ टीम
टीईटी परीक्षेत घोटाळ्याप्रकरणी शिंदे गटातील अब्दूल सत्तार यांच्या चार मुलांचेही दोषी म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही, अशी चर्चा रंगत होती. मात्र, अचानक आरोप असताना सत्तार यांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. सत्तार यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. अब्दुल सत्तार यांना शपथ दिल्यामुळे विरोधकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.आम आदमी पार्टी महाराष्ट्रने तर पत्र काढत अब्दुल सत्तर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
आम आदमी पार्टी महाराष्ट्रचं पत्र जसं आहे तसं:
प्रति,
संपादक / पत्रकार बंधू व भगिनी,
महाराष्ट्र.
विषय : मंत्री मा. अब्दुल सत्तर यांनी राजीनामा द्यावा, आम आदी पार्टीची मागणी
नमस्कार,
आज भाजपा प्रणित सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेले माननीय मंत्री अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांची नावे टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी शासनाकडून दोषी म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. एकूण ७८७० नावांची यादी शासनाने TET परीक्षेत अनैतिक मार्गाचा अवलंब केला म्हणून जाहीर केली आहे त्यातील ही चार नावे आहेत.
या परीक्षेसाठी २०१८ मध्ये एकूण दोन लाख ५४ हजार ४२६ विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र झाले होते. या परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गाकडून रु.५००/- फी व मागास प्रवर्गाकडून रु.२५०/- फी आकारण्यात आली होती. जवळपास दहा कोटी रुपये या बेरोजगार विद्यार्थ्यांकडून शासनाने गोळा केले आणि अपात्र विद्यार्थ्यांना पात्र दाखवून या लाखो विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ करण्याचं धोरण शिक्षण विभागाने अवलंबलं आहे का असा प्रश्न निर्माण होतो. TET परीक्षा प्रकरण उघडकीस आले पण त्याच वेळेस घेण्यात आलेल्या म्हाडा, PWD प रिक्षांबाबत काय? यातील अनेक विद्यार्थी आता शासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि भरलेले पैसे वसूल करत आहेत.
या सर्व प्रकरणांमध्ये आम आदमी पक्षाला काळजी वाटते की ज्या विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला आपल्या आई-वडिलांचे कष्टाचे पैसे परीक्षा फी म्हणून भरले त्या सर्व विद्यार्थ्यांच्या जीवनात अंधकार निर्माण करण्याचे काम काही प्रस्थापित राजकारणी आणि प्रशासनातील अधिकारी मिळून करत आहेत.
एकूण १६७०५ विद्यार्थी या परीक्षेत पास झाले होते त्यापैकी ७८८० विद्यार्थ्यांची यादी गैरमार्गाचा अवलंब केला म्हणून प्रकाशित झाली आहे. यापैकी ७५५० विद्यार्थ्यांनी गैरमार्गाने आपले मार्क वाढवून घेतले.२९३ विद्यार्थी अपात्र होते त्यांना पात्र दाखवण्यात आला आहे आणि ८७ विद्यार्थी दलालांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते म्हणून ते अपात्र !
मंत्री अब्दुल सत्तार जे सांगत आहेत की माझी मुले अपात्र होते म्हणजेच ते शासनाने जाहीर केलेल्या या २९३ विद्यार्थ्यांमधील असावेत.
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांना मुलीचा एक मार्क वाढवला म्हणून राजीनामा द्यावा लागला होता. इथे तर पूर्ण नापासलाच पास करण्याचा प्रकार आहे आणि त्याचे बक्षीस म्हणून भाजपाचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी मा. अब्दुल सत्तारांना मंत्री बनवले आहे. नव्या मंत्री मंडळाची सुरुवातच अशी झाली आहे तर पुढचा पिक्चर कसा असेल याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा.
माननीय मंत्री अब्दुल सत्तार यांनी तातडीने शिक्षण अधिकारी व उपसंचालक यांचे पत्र जाहीर केले की सत्तार यांच्या मुलांनी TET सर्टिफिकेट दाखल करून कोणताही फायदा घेतला नाही. सर्वात प्रथम आम आदमी पक्षाला या शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक यांचं कौतुक करावसं वाटतं की केवळ काही तासांच्या आत त्यांनी मंत्री महोदयांच्या मुलांना क्लीन चिट दिली. या शिक्षणाधिकारी आणि उपसंचालकांची शासनाने चौकशी करावी कारण पालक शाळांच्या फी वाढीत विरोधात अर्ज करतात त्यांना सहा सहा महिने उत्तर मिळत नाही आणि काही तासात मंत्र्यांच्या मुलांना क्लीनचीट?
अब्दुल सत्तार हे आजच मंत्री झाले आहेत आणि लगेचच त्यांचा राजीनामा मागवा लागतो आहे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.
आम आदमी पक्ष या संपूर्ण प्रकरणाची निपक्षपाती चौकशी करण्याची मागणी शासनाकडे करत आहे आणि मंत्री महोदय अब्दुल सत्तार यांनी त्वरित आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन निलंगेकरांचा आदर्श घ्यावा अशी मागणी राज्य सचिव धनंजय रामकृष्ण शिंदे यांनी केली आहे.
धन्यवाद,
आम आदमी पार्टी महाराष्ट्रा करिता,
माध्यम विभाग.