मुक्तपीठ टीम
गेल्या ४० दिवसांपासून रखडलेल्या महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा छोटेखाणी विस्तार झाला आहे. राजभवनातील हॉलमध्ये शपथविधी सोहळा पार पडत आहे. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे गटातील वादग्रस्त नव्या मंत्र्यांना संधी देण्यात आल्याने भाजपामध्ये नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी शिंदे गटातील संजय राठोड यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. संजय राठोड यांना शपथ देण्यात आल्यामुळे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेतल्याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, राठोडांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे नव्या मंत्रिमंडळातील वादग्रस्त नेत्यांच्या समावेशाचा मुद्दा आता चर्चेत आला आहे. आणखी कोण आहेत, असे मंत्री याचा आढावा…
चित्रा वाघ आक्रमक!!
चित्रा वाघ यांनी ट्वीट करत संजय राठोड यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे, असे चित्रा वाघ यांनी म्हटलंय.
या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असं म्हणत मुख्यमंत्री कार्यलायच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केलं आहे.
राठोडांवर काय होते आरोप?
- संजय राठोड हे ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री होते.
- पुण्यात पूजा चव्हाण या तरुणीचा गूढ मृत्यू झाला.
- त्या मृत्यूसाठी संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपाने आक्रमक भूमिका घेतली.
- अखेर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची हकालपट्टी केली.
- काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी त्या प्रकरणातून राठोडांचा संबंध नसल्याचा दावा केला.
- तरीही भाजपाने त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणे सुरु ठेवले.
वादग्रस्त नवे मंत्री कोण?
संजय राठोड
संजय राठोड हे यवतमाळमधून निवडून येणारे शिवसेनेचे आमदार. ठाकरे सरकारमध्ये ते वनमंत्री होते. पुण्यात पुजा चव्हाण या तरुणीच्या मृत्यूला संजय राठोड कारणीभूत असण्याचा आरोप करत भाजपाने रान उठवलं होतं. अखेर राठोडांना राजीनामा द्यावा लागला होता. आता त्यांचा समावेश झाल्यानंतर चित्रा वाघ यांनी राठोडांना मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे, असं म्हटलं आहे. तसेच संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला, तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे…जितें, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
विजयकुमार गावित
- भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
- राज्याच्या गृहविभागाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला गावित आणि नातेवाईकांविरुद्ध चौकशी करण्याची परवानगी दिली होती.
- याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल झाली होती.
- त्यात माजी मंत्री गावित, त्यांचे आमदार बंधू शरद आणि काही कुटुंबीयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप केला होता.
- आदिवासी विकास मंत्रालयाशी संबंधित सहा हजार कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या गायकवाड समितीनं सादर केलेल्या अहवालाची छाननी करण्यासाठी फडणवीस सरकारने आणखी एक समिती नेमली होती.
- आदिवासी विकास घोटाळ्यात चौकशी समितीच्या अहवालानंतरही आरोपींविरोधात कारवाई का केली नाही?
- यावर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठीने सोमवारी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
अब्दूल सत्तार
टीईटी परीक्षेत घोटाळा खूप गाजला. त्यात अब्दूल सत्तार यांच्या दोन मुलींचाही समावेश असल्याचा आरोप झाला. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही, अशी चर्चा होती. मात्र, सत्तारांनी फक्त मुलाला मुख्यमंत्र्यांकडे नेऊन आणि न्यूज चॅनल्सच्या मदतीने चालवलेली क्लीनची मोहीम यशस्वी झाल्याची चर्चा आहे.
संदिपान भुमरे
संदिपान भुमरे हे ठाकरे सरकारमध्ये रोजगार हमी, फलोत्पादन मंत्री होते. त्यांच्यावर रोहयो हजेरी प्रकरणात आरोप झाला होता. पुढे ते प्रकरण हजेरी कारकुनांवर कारवाई करुन संपले. तसेच कोरोना काळातील मदत आणि भूखंड प्रकरणातही ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते.