मुक्तपीठ टीम
राज्यातील सध्याची अस्थिर राजकीय परिस्थिती लक्षात घेत मराठा समाजानं आता आपल्या सतत डावललेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीच्या हमखास पूर्ततेसाठी पुन्हा जोरदार तयारी सुरु केली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने प्रा. डॉ. बाळासाहेब पाटील सराटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुलं पत्र लिहिलं आहे. या पत्रानुसार, सध्याच्या अस्थिर परिस्थितीत जो नेता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून सुरक्षित आरक्षण देईल, तोच नेता या समाजाच्या ४० टक्के मतांचा हक्कदार ठरू शकेल. त्यामुळे मराठा व्होटबँक संघटित करुन तिचा दबाव सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर पक्षांच्या मराठा राजकीय नेत्यांवर आणण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
सकल मराठा समाजाचे निवेदन
शिंदे साहेब, तुम्ही एक ऐतिहासिक धाडस करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. पण आपले सरकार अस्थिर आहे, हे आपण जाणता. शिवसेनेसोबत मैदानात आणि सर्वोच्च न्यायालयात लढाई सुरू आहे. सत्तेचा अपेक्षित वाटा मिळाला नाही, तर तुमचे साथीदार कसे वागतील, हेही सांगता येत नाही. आज तुमच्या आघाडीत केवळ भाजप एक संघटित पक्ष आहे. आधीचे सरकार बरखास्त झाले, राज्यातील विरोधक दुर्बल झालेत. त्यामुळे भाजपचे काम झालेले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल कसाही लागला तरी त्यांचे काहीच बिघडणार नाही. त्यामुळे ज्यांच्या भरवशावर तुम्ही एवढे धाडस केले तो भाजप देखील तुमचा केंव्हा घात करील, याचीही चिंता आहेच.
समजा तुमचे सरकार पुढील कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही, तर काय होईल, याची कल्पनाही तुम्ही केली नसेल. अशा अस्थिर राजकीय परिस्थितीत आपल्या बाजूने एका भक्कम व्होट-बँकेची गरज आहे. तरच तुमच्या राजकीय अस्तित्वाला आधार मिळू शकेल. त्यासाठी तुम्ही न्या. गायकवाड आयोगाच्या शिफारशीनुसार त्वरित मराठा समाजाचा ओबीसीच्या यादीत समावेश करा, राज्यातील ४० टक्के लोकसंख्येची मराठा व्होट-बँक तुमच्या मागे ऊभी राहील आणि तुमच्या सगळ्या राजकीय चिंता मिटतील. तुमच्या सरकारला स्थैर्य लाभेल आणि २०२४ च्या निवडणुकीचा मार्गही प्रशस्त होईल. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिग यांनी जाता जाता ओबीसी आरक्षण दिले आणि ते पुढे चालूच राहिले, हे उदाहरण लक्षात घेण्यासारखे आहे.
शिंदे साहेब, तुमचा ४० आमदारांचा एक तात्कालिक गट आहे, अनेक वर्षांची संघटना नव्हे. तुमच्या गटाला अद्याप सर्वमान्य असे निश्चित धोरण, ध्येयवाद आणि विचारधारा लाभलेली नाही. अद्याप तुमच्या गटाचे अस्तित्व एका नैसर्गिक संघटनेत रुपांतरित झालेले नाही. तुमच्या गटातील सर्व आमदार व खासदार शिवसेनेतून आलेले आहेत. त्यांच्या गटाला तुमचे नाव दिले जात असले, तरी ते भाजप मुळे बाहेर पडलेले आहेत, हे सत्य ध्यानात घ्यावे लागेल. म्हणून तुम्हाला स्थिर राजकीय अस्तित्वासाठी एका निश्चित व्होट-बँकेची अत्यंत गरज आहे. दुसरीकडे काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून मराठा समाजाची फसवणूक झालेली आहे. एक राजकीय व्होट-बँक म्हणून या समाजाच्या आरक्षण व इतर समस्यांकडे कोणताही मोठा पक्ष लक्ष द्यायला तयार नाही. तुमचे सरकार हे मराठा –ब्राह्मण युतीचे सरकार आहे आणि एक मराठा नेता म्हणून राज्याचे मुख्यमंत्री पद तुम्हाला मिळालेले आहे. त्यामुळे तुमच्या हातून मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गाच्या यादीत समावेश केला जाईल आणि अन्य प्रमुख प्रश्नांची दखलही घेतली जाईल अशी रास्त अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तुम्ही मराठा व्होट-बँकेचे मूल्य लक्षात घेऊन न्याय दिला तर हा समाज निश्चितच तुम्हाला साथ दईल आणि विद्यमान संकटात तुम्हाला या समाजाचे व्यापक पाठबळ मिळेल.
शपथ घेतल्यानंतर पाहिले काम म्हणून तुमच्या सोबतच्या देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षणाचा आढावा घेतला. सर्वोच्च न्यायालयासह सर्व स्तरांवर परिस्थिती हाताळून शेवटी त्यांनी ओबीसी आरक्षण दिलेच. देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी व्होट-बँकेची जशी काळजी घेतली, तशी तुम्ही मराठ्यांची घ्यावी, अशी तुमच्याकडून वाजवी अपेक्षा आहे. राज्यातील सर्वच पक्षांना ओबीसी व्होट-बँकेची काळजी आहे. सर्वच पक्षांनी ओबीसींच्या प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडण्यासाठी वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केलेली आहे. याउलट मराठा आरक्षणासह अन्य प्रश्नांचा सर्वच पक्षांना जणू विसरच पडलेला आहे. म्हणजे कोणत्याच पक्षाला अथवा वरिष्ठ नेत्याला मराठा व्होट-बँकचे महत्व समजलेले नाही. पण या मराठा व्होट-बँकेमुळेच देवेद्र फडणवीस पुन्हा येऊ शकले नाहीत आणि त्यांची मुख्यमंत्री होण्याची संधी कायमची गेलेली आहे. या सत्य घटनेची नोंद घेऊन तुम्ही मराठा समाजाला न्याय द्यावा,असे विनम्र आवाहन करण्यात येत आहे.
प्रा. डॉ. बाळासाहेब पाटील सराटे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना खुलं पत्र
प्रा. डॉ. बाळासाहेब पाटील सराटे
मो. क्र. ७०३०९०१०७४ / ७४९९४३८८१७
Email: drbalasaheb54@gmail.com
छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्र.
दिनांक : ०५ ऑगस्ट २०२२
प्रति,
मा. एकनाथजी शिंदे साहेब,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र शासन,
मंत्रालय, मुंबई – ४०००३२.
महोदय,
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन !
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आम्ही आपणांस नम्र निवेदन सादर करीत आहोत. आपल्या नेतृत्वात स्थापन झालेलया नवीन राजकीय गटाला सरकार स्थापन करण्याची अभूतपूर्व संधी मिळालेली आहे. परंतु या नवीन गटाला राजकीय स्थैर्य प्राप्त होण्यासाठी निश्चित व्होट-बँकेची नितांत आवश्यकता आहे. त्यादृष्टीने एक स्थिर व्होट-बॅंक म्हणून मराठा समाजाचा विचार केला जाऊ शकतो, ही बाब लक्षणीय आहे.
महाराष्ट्रात मराठा समाजाची एकंदरित लोकसंख्या किमान ४० टक्क्यांपर्यंत आहे, ही बाब आपणांस ज्ञात आहेच. राज्यात सर्वत्र प्रभाव, एकगठ्ठा लोकसंख्या, राजकीयदृष्ट्या जागृत समाज आणि निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज यामुळे मराठा समाजाच्या पाठींब्याशिवाय कोणताही राजकीय पक्ष यशस्वी होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. राजकीय अस्थिरतेमुळे आपल्यासाठी मराठा समाजाच्या पाठींब्याचे महत्व आणखीच वाढलेले आहे.
मराठा समाजाचा ज्या राजकीय पक्षाला पाठींबा असेल तोच राजकीय पक्ष आगामी काळात राज्याच्या सत्तेवर राहू शकेल, हे एक वास्तव आहे. राज्यातील शासनाचा एक प्रभावी घटक म्हणून आपल्या पक्षाला मराठा समाजाचा पाठींबा निश्चितच लाभदायक ठरू शकतो. मराठा समाजाच्या आशीर्वादाने राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आपला कार्यकाळ पूर्ण करून आगामी निवडणुकीतही यश मिळू शकते, ही गोष्टही तितकीच महत्वाची आहे.
करिता, मराठा समाजाच्या एकमुखी पाठींब्यासाठी “कुणबी आणि मराठा समाज एकच असल्याची न्या. गायकवाड अहवालातील शिफारस स्वीकारून” मराठा समाजाचा ओबीसीच्या यादीत समावेश करावा, ही नम्र विनंती.
अधिक तपाशीलासाठी विस्तृत निवेदन सोबत जोडलेले आहे, त्यातील सर्व मुद्यांचे अवलोकन करून मराठा समाजास घटनात्मक आरक्षणाचे लाभ द्यावेत, अशी विनम्र पार्थना.
जय शिवराय ! जय मराठा !!
आपला,
प्रा. डॉ. बाळासाहेब पाटील सराटे
!! एक मराठा – लाख मराठा !!
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाच्या ३२ टक्क्यांत घटनात्मक आरक्षण कसं शक्य?
वाचा:
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गाच्या ३२ टक्क्यांत घटनात्मक आरक्षण कसं शक्य?