मुक्तपीठ टीम
टिकटॅक स्टार पूजा चव्हाणच्या कथित मृत्यू प्रकरणामध्ये नाव समोर आलेल्या राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी मौन धारण केले होते. मात्र, आज १५ दिवसांनंतर राठोड जनतेसमोर आले. संजय राठोड यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत पोहरादेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर राठोड यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी “पोहरादेवीचे दर्शन घेऊन कामांना सुरुवात करणार आहे” असे म्हटले आहे.
संजय राठोड म्हणाले, “पूजा चव्हाण या बंजारा समाजातील तरुणीच्या मृत्यूबद्दल आम्हाला दुःख आहे. तिच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि समाज सहभागी आहे. मी ओबीसी समुदायाचे नेतृत्व करणारा कार्यकर्ता आहे. माझे राजकीय जीवन उद्धध्वस्त करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माध्यमांनी जे दाखवलं, त्यात कोणतंही तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलीस तपास करत आहेत. पण, माझ्या आणि समाजाबद्दल घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला गेला. चौकशीतून जे समोर येईल. ते बघा…,” असे म्हणत संजय राठोड यांनी आपली सावध भूमिका मांडली.
पूजाच्या आत्महत्येनंतर भाजपाकडून राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती. पण पत्रकार परिषद घेत राठोड यांनी राजीनामा देणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले. “गेल्या दहा दिवसांपासून अलिप्त होतो. या काळात मी माझे आईवडिल, माझी पत्नी आणि मुलांना सांभाळण्याचे काम करत होतो. तसेच शासकीय कामसुद्धा मुंबईतील फ्लॅटवरून सुरू होतो. माझं काम थांबले नव्हते. आज इथे दर्शन घेऊन पुन्हा एकदा कामाला सुरूवात करणार आहे,” असे म्हणाले. त्यामुळे राजीनाम्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला.