मुक्तपीठ टीम
तरुणांमध्ये शास्त्रीय संगीताची गोडी वाढावी म्हणून कार्यरत असणाऱ्या ‘ऋत्विक फाउंडेशन’च्या वतीने शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील दिवंगत दिग्गज गुरूंना समर्पित अशा पहिल्यावहिल्या ‘बेल्स इन रेझोनन्स’ (घंटेचा अनुनाद/निनाद) संगीत महोत्सवाची सुरुवात करण्यात येत आहे. यंदा महोत्सवाचे पहिले वर्ष पद्मविभूषण ज्येष्ठ कथक गुरु पंडित बिरजू महाराज व संगीत नाटक अकादमीचा संगीतरत्न पुरस्कारप्राप्त गुरु पंडिता रोहिणी भाटे यांना समर्पित आहे. महोत्सव शनिवार ३० व रविवार ३१ जुलै २०२२ रोजी कोथरूडमधील ऋत्विक फाउंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स येथील सभागृहात सायंकाळी ६ वाजता होणार आहे.
कार्यक्रम विनामूल्य व सर्वांसाठी खुला आहे.भारतात अनेक शास्त्रीय नृत्य प्रकार आहेत आणि त्यात भरघोस काम करून आपली एक ठळक ओळख निर्माण करणारे अनेक दिग्गज गुरु होऊन गेले आहेत. त्या सर्व गुरूंना मानवंदना देण्याचा प्रयत्न या महोत्सवाद्वारे करणार असल्याचे प्रसिद्ध कथक नृत्यांगना, फाउंडेशनच्या क्रिएटिव्ह अडवायझर व कार्यक्रमाच्या संयोजक ऋजुता सोमण यांनी सांगितले. हा महोत्सव दरवर्षी एक एक नृत्यप्रकार व त्यातील मान्यवर गुरूंना समर्पित असणार आहे. यात कथक, भरतनाट्यम, कुचिपुडी, ओडिसी, कथकली, सत्तरीया, मोहिनीअट्टम आणि मणिपुरी अशा विविध शास्त्रीय नृत्यशैलींचा समावेश असेल. तरुणपिढीला या दिग्गजांच्या कामाविषयी माहिती व्हावी त्यातून प्रेरणा मिळावी हा यामागचा उद्देश आहे.
हा महोत्सव प्रत्येक वर्षी देशातील विविध शहरांमध्ये करण्याचा मानस आहे. देशभरातील सर्वच शास्त्रीय नृत्यशैलींचा सर्व समावेशक असा हा पहिलाच संगीत महोत्सव असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.महोत्सवाची सुरुवात शनिवार दि. ३० सायंकाळी ६ वाजता होणार असून यावेळी पंडिता रोहिणी भाटे यांच्या शिष्या प्रसिद्ध कथक नृत्यांगना ऋजुता सोमण यांच्या सादरीकरणाने होणार आहे. त्यानंतर पंडित बिरजू महाराज यांच्या शिष्या गुरु राणी खनम यांचा नृत्याविष्कार सादर होणार असून, अमान अली (तबला), मनोज देसाई (हार्मोनियम व गायन), नासिर खान (सारंगी) यांची साथसंगत असणार आहे.
पहिल्या दिवसाचा समारोप ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर व त्यांचे सुपुत्र अभिजित पोहनकर यांच्या गायनाने होणार आहे. त्यांना मुकुंदराज देव (तबला), मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम) यांची साथसंगत असणार आहे.महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रविवार दि. ३१ रोजी जयपूर घराण्याचे ज्येष्ठ कथक नर्तक पंडित राजेंद्र गंगाणी यांचा नृत्याविष्कार सादर होणार असून, त्यांना पंडित योगेश समसी यांची तबल्याची साथसंगत असणार आहे. शिवाय फतेहसिंग गंगाणी (पखवाज), मनोज देसाई (हार्मोनियम व गायन), नासिर खान (सारंगी) यांची साथसंगत असेल.