मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्याने पक्षावर मोठे संकट आले आहे. सध्या उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना असे दोन गट पडले आहे. दोन्ही गटाकडून शक्तिप्रदर्शन केले जात आहे. बंडखोऱ्यांना उत्तर देण्यासाठी आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा दर्शवण्यासाठी शिवसैनिक सरसावले आहेत. शिवसैनिक हातात पेटते दिवे घेऊन तर कधी बंडखोरांना आव्हान तर कधी पदाधिकाऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र व ऑनलाईन सदस्य नोंदणी करून घेतली जात आहे.
हातात पेटते दिवे घेऊन शिवसैनिकांनी घेतली एकनिष्ठतेची शपथ!!
- उद्धव ठाकरे यांच्यावरील निष्ठा दर्शवण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जळगावात हातात पेटते दिवे घेऊन एकनिष्ठतेची शपथ घेतली.
- जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे गुरुवारी संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला.
- या मेळाव्यात संजय सावंत यांनी उपस्थित सर्व शिवसैनिकांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याची एकनिष्ठेची शपथ देण्यात आली.
- प्रत्येक शिवसैनिकाने हातात दिवे घेऊन आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची शपथ यावेळी घेतली.
- यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
संजय सावंतांचा बंडखोरांना इशारा!!
- जळगाव जिल्हृयात सर्व लोकसभा मतदारसंघांनिहाय शिवसेना पक्ष बळकटीकरण तसेच संघटीत करण्यासाठी शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत.
- त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी जळगाव शहरातील केमिस्ट भवन येथे शिवसेना जळगाव लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते पदाधिकारी यांचा मेळावा पार पडला.
- यावेळी संपर्कप्रमुख संजय सावंत हे आक्रमक दिसले.
- आज उध्दव ठाकरे यांना ज्यांची गरज होती, त्यावेळी यांनी बंड पुकारले.
- जर तुमच्याच जिद्द असेल, मर्दपणा असेल असे तर महाराष्ट्रात आमदारकीचा राजीनामा द्या, अन् निवडून येतांना सांगा की निवडून आलो.
- नाही तर तर हा शिवसैनिक तुम्हाला गाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संजय सावंत यांनी बंडखोरांना दिले आहे.
धुळ्यात निष्ठा व्यक्त करणारी प्रतिज्ञा!!
- धुळे जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून शिवसेना वाचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
- शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील प्रत्येक शिवसैनिकांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर पक्षप्रमुखांविषयी व मूळ शिवसेनेविषयी निष्ठा व्यक्त करणारी प्रतिज्ञा लिहून घेतली जात आहे.
- आमदारांच्या बंडखोरीनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिवसैनिकांकडून आपण उद्धव ठाकरे गटातील मूळ शिवसैनिक असल्याबाबत १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणी करून घेण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते.
- त्यानुसार धुळे शहरातील शिवसेनेच्या मुख्य कार्यालयात पदाधिकारी व शिवसैनिकांकडून ही स्टॅम्प भरून घेतले जात आहे.
- जवळपास पाच हजार स्टॅम्प पेपर्स धुळे जिल्ह्यातील शिवसैनिकांतर्फे भरून घेण्यात आले आहेत.
असे आहे शपथपत्र
नाव, वय, पत्ता, शिवसेनेतील पदाच्या उल्लेखासह मी गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञापत्र घोषित करीत आहे की, माझी शिवसेनेच्या घटनेवर पूर्ण निष्ठा व श्रद्धा आहे. वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श-तत्त्वांवर अढळ निष्ठा आहे. माझा पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंच्या प्रती मी पूर्ण निष्ठा व्यक्त करीत आहे. शिवसेनेच्या घटनेतील उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी मी कार्यरत राहील, असे मी प्रतिज्ञापत्र बाँडद्वारे लिहून देत आहे.