मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांनी नेते पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेबद्दल बोलताना त्यांना अश्रू अनावर झालं. तसेच त्यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंवर संतप्त टीका केली. यावर उद्धव ठाकरे यांनी रामदास कदम यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, मला त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं. मागितलं तर आम्ही काहीही देऊ पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी रामदास कदमांना लगावला. जिल्हाप्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीला संबोधित करताना ते बोलत होते.
रडण्याचे ढोंगसोंग करु नका!!
- आमदार-खासदारांना मी देखील डांबून ठेऊ शकतो.
- पण याला लोकशाही म्हणायचं का?? तुम्ही मनाने तिकडे गेले असाल तर मी किती दिवस तुम्हाला डांबून ठेवू शकतो.
- असल्या गोष्टींवर माझा विश्वास नाहीये.
- मी गेल्या काही दिवसांपासून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना भेटतोय.
- त्यांना सगळ्यांना सांगितलंय, ज्यांना जायचं त्यांनी जरूर जा, पण नाटकं करुन जाऊ नका.
- उगाचच टीव्ही समोर जाऊन रडण्याचं ढोंग करू नका.
- तुम्हाला ज्यावेळेला जे जे मिळालं ते ते तुम्ही आनंदाने भोगलं.
- शिवसेनेच्या विरोधात कारवाया करायच्या त्याही तुम्ही केल्या.
- आता रडण्याचे ढोंगसोंग करु नका.
- शिवसैनिक तुम्हाला पुरतं ओळखून आहे.
हिसकावू पाहिलंत तर जागा दाखवू!
- आज जे काही आपल्यासोबत होतंय ते पाहून असं वाटतंय की हे सगळे आपल्या मुळावर घाव घालायला निघाले आहेत.
- आपण इतके वर्ष ज्यांना आपलं मानलं, ते आपल्याला संपवायला एवढे सुडाने पेटले आहेत की काहीही करुन शिवसेना संपलीच पाहिजे या भाजपाच्या डावाला बळी पडून ते आपल्यावरच घाव घालत आहेत.
- माझा स्वभाव सगळ्यांना माहिती आहे, मला त्यांनी मागितलं असतं तर मी दिलं असतं.
- जो बाळासाहेबांचाही होता.
- मागितलं तर आम्ही काहीही देऊ पण हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.