मुक्तपीठ टीम
शहरं म्हटलं की कचरा आलाच आला. त्याची वासलात लावण्यासाठी डंपिंग ग्राऊंडही. लाखोंनी तयार केलेल्या या कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमध्येच समाजातील हजारोंचं जीवन जातं. त्यांच्यातील कोवळ्या जीवांचं भविष्य सोन्यासारखं लखलखावं, असा प्रयत्न जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था करत आहे. त्यासाठी दररोज संध्याकाळी जिजाऊची शाळा डंपिंग ग्राऊंडवर भरते.
ठाण्यातील डंपिंग ग्राऊंडवर राहणाऱ्या मुलांचं भवितव्य घडवणाऱ्या जिजाऊच्या शाळेबद्दल जळगावच्या बाल कल्याण समितीचे सदस्य़ संदीप निंबाजी पाटील (सोनवणे) यांनी मांडलेल्या भावना: कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून सुरू होणारी वाट शिक्षणा मार्गे मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था करत आहे .
११ आणि १२ जुलै हे दोन दिवस ठाणे येथे जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था आयोजित करिअर मार्गदर्शन तसेच पोलीस भरती कार्यशाळा च्या निमित्तानं ठाणे महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या माध्यमिक विद्यालये तसेच ठाण्यातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलं ज्या शाळांमध्ये शिकतात अशा विविध शाळामध्ये वरील मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते ..
थोडक्यात सर्वसामान्य कुटुंबात असलेल्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन, व्यक्तिमत्व विकसन तसेच भविष्यात होणाऱ्या शालेय स्तरीय व पुढील शैक्षणिक प्रवेशासाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे योग्य मार्गदर्शन मिळावे आणि आतापासून आवश्यक त्या तयारीला विद्यार्थ्यांनी सुरवात करावी जेणेकरून ही आर्थिक दुर्बल, दुर्लक्षित घटकातील विद्यार्थी या स्पर्धेच्या युगात मागे पडणार नाही या हेतूने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते..
यादरम्यान जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे सचिव आदरणीय श्री.केदार दादा चव्हाण यांनी मला कल्पना दिली की ठाणे शहरात आनंद नगर याठिकाणी संपूर्ण शहराचा कचरा आणून टाकला जातो त्या ठिकाणी ते कचऱ्यात काम करणाऱ्या लोकांच्या झोपड्या आहेत आणि त्यांच्या मुलांचं शैक्षणिक पालकत्व जिजाऊं शैक्षणिक व सामाजिक संस्थने घेतले आहे .त्या मुलांशी संवाद साधावा या हेतूने मी आनंद नगर च्या त्या कचरा डम्पिंग ग्राउंड वर श्री.परेश दादा सोबत गेलो . तिथे राहत असलेल्या मुलांना एकत्र करण्यासाठी आम्ही त्यांच्या कचऱ्याचा डोंगरात असलेल्या झोपडपट्टीत शिरलो मुलांना एकत्र जमवल्या नंतर त्यांच्याशी गप्पा मारल्या व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.. अत्यंत बिकट, हलाखीच्या परिस्थितीत असणाऱ्या मुलांना जिजाऊ ने जो मदतीचा हात दिला होता त्यामुळे ती मुलं आनंदी वाटली.. त्यांच्या शालेय स्तरावरील सर्व गरजा जिजाऊ पूर्ण करत आहे, त्यातील दोन मुलांना तर हॉटेल मॅनेजमेंट या कोर्सला सव्वा लाख रुपये प्रत्येकी एवढी फी भरून प्रवेश घेऊन दिला आहे..
रोज संध्याकाळी दोन तास त्या मुलांची शिकवणी वर्ग जिजाऊ च्या माध्यमातून घेतला जातो, त्यासाठी स्वतंत्र पगारी शिक्षक नेमले आहेत. वह्या, पुस्तके, गणवेश आणि त्या व्यतिरिक्तही काही लागलं तर ती मुले आपल्या मोठ्या भावाला सांगतात अशा पद्धतीने परेश दादाला सांगून या सर्व गोष्टी ची पूर्तता करून घेत होते..
त्यातली काही मुलं अनाथ आहेत काहींचे एक पालक गमावलेले आहेत आणि जिजाऊने हे कार्य सुरू करण्या अगोदर ही लहान मुले देखील विविध कामात गुंतलेली होती. बालमजूर होती परंतु हळूहळू यातून ही मुलं बाहेर पडून आता शिक्षणाच्या वाटेकडे वळाली आहेत, त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींची पूर्तता जिजाऊ करत आहे खरंच कचऱ्याच्या ढिगात अडकलेलं बालपण समृद्ध करण्यासाठी जिजाऊने उचललेलं पाऊल अत्यंत अभिमानास्पद आणि आदर्शवत आहे.
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे संस्थापक आदरणीय आप्पासाहेब निलेशजी सांभरे तसेच या संस्थेचे सचिव आदरणीय केदार दादा चव्हाण आणि संपूर्ण सहकारी यंत्रणेचे मी मनापासून आभार मानतो ज्यांनी अत्यंत हलाखीत आणि कचर्यात पडलेल्या बालकांचे बालपण हिरावून घेण्यापासून वाचवलं आणि त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची वाट दाखवली..
धन्यवाद
संदीप निंबाजी पाटील (सोनवणे) सदस्य बाल कल्याण समिती- जळगाव (बेंच ऑफ मॅजिस्ट्रेट)
सदस्य महिला शक्ती केंद्र- जळगाव दीपस्तंभ फाउंडेशन-जळगाव
स्वयंदीप प्रतिष्ठान- डांभुर्णी