मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक हे गेले कित्येक महिने तुरुंगात आहेत. त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली आहे. त्यांना अद्याप जामीन मिळालेला नसतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका खासदारावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे.
सीबीआयने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. टून माशांच्या निर्यातीत भ्रष्टाचार केल्याप्रकणी हा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी दिल्ली, कालिकत आणि लक्षद्वीपमधील आरोपींच्या सहा ठिकाणांवर छापे टाकण्यात येत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
- मोहम्मद फैजल हे लक्षद्वीप लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आहेत.
- याप्रकरणी फैजल यांचा पुतण्या आणि श्रीलंका येथील एसआरटी जनरल मर्चंट्स या कंपनीला देखील सह आरोपी करण्यात आलं आहे.
- फैजल आणि त्यांचा पुतण्या यांच्यावर टून माशांच्या निर्यातीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे.
- फैजल यांचा पुतण्या हा एसआरटी जनरलचा प्रतिनिधी म्हणून काम करतो.
- टून माशांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत ४०० रुपये प्रतीकिलो आहे.
- फैजल यांनी लक्षद्वीप सहकारी विपणन संघाच्या माध्यमातून स्थानिक मच्छिमारांकडून टून मासे खरेदी केले आणि एसआयटी या कंपनीला निर्यात केले.
- या कंपनीकडून मच्छिमारांना त्याचा कोणताही मोबदला मिळाला नाही.
- त्यामुळे या प्रकरणाची तक्रार सीबीआयकडे करण्यात आली.
यापूर्वी असे समोर आले होते की, सीबीआय आणि लक्षद्वीप प्रशासनाच्या दक्षता अधिकाऱ्यांनी अनेक विभागांमध्ये अचानक तपासणी केली होती. या विभागांमध्ये लक्षद्वीप को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन (LCMF), मत्स्यव्यवसाय विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, खादी मंडळ आणि सहकारी संस्था आणि पशुसंवर्धन विभाग यांचा समावेश आहे. त्यानंतर हा घोटाळा उघड झाला. तपासणीदरम्यान सीबीआय अधिकाऱ्यांनी घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रेही जप्त केली, त्या आधारे पुढील कारवाई करण्यात आली. या प्रकरणाच्या चौकशीनंतर निर्यात प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन झाल्याचे निष्पन्न झाले.