मुक्तपीठ टीम
संपूर्ण राज्यभरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याकडून महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे रेड अलर्ट दिलेल्या ठिकाणी नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अतिआवश्यक कामासाठी बाहेर पडा असं सांगण्यात आलं आहे. तसेच मुंबई आणि कोकणातील अन्य जिल्ह्यांमधील समुद्र किनाऱ्यांवर तसेच धोक्याचा इशारा दिलेल्या जिल्ह्यांमधील नद्यांच्या किनारी जाणे टाळावे, असं बजावण्यात आलं आहे.
कुठे कोणता अलर्ट?
- राज्यात पालघर, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी आणि पुणे या जिल्ह्यांसाठी जिल्ह्यांसाठी १४ ते १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- मुंबईत रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्टच्या दिवशी मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर जाण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे.
- १२ जुलै रोजी पूर्व मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे
राज्यात मुसळधार पाऊस!!
- शिराळा तालुक्यातील चांदोली धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र पावसाची संततधार कायम सुरूच आहे. गेल्या २४ तासात साठ मिलिमीटर तर आज अखेर ७२० मिलिमीटर पावसाची नोंद झाले आहे.
- धुळे शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे.
- साखरी माळमाथा परिसरात झालेल्या पावसामुळं अक्कलपाडा धरणात देखील जलसाठा वाढला आहे. नदीच्या पुलावर एनडीआरएफ तसेच अग्निशामक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
- पहाटे मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध भीमाशंकर मंदिर रस्त्यावर दरड कोसळली. ढिगाऱ्याखाली कोणीही अडकले नसून कोणीही जखमी झाले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. भीमाशंकर मंदिर हे देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे, जे खेड तालुक्यात पुण्यापासून १०० किमी अंतरावर आणि मुंबईपासून २०० किमीपेक्षा जास्त अंतरावर आहे.
महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसामुळे नाशिकमधील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून तीन जण बेपत्ता झाले आहेत. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या काठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
१२ ते १५ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे. यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे शहर आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे शहरालगतच्या विविध धरणांमधील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरले असून धरणाच्या सांडव्यातून सुरू असलेला विसर्गही वाढवून दुपारी १ वाजता ११,९९ क्युसेक करण्यात आला आहे.
मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अशात मुंबईकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, हवामान खात्याकडून मुंबईला ७२ तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.