मुक्तपीठ टीम
भारताची संरक्षण क्षेत्रातील निर्यात १३ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहचली आहे. याआधी भारत संरक्षण क्षेत्रात मोठी आयात करणारा देश म्हणून ओळखला जात होता. तोच देश आता संरक्षण क्षेत्रात आता हजारो कोटी रुपयांची निर्यात करू लागला आहे. २०२१-२२ या आर्थिक वर्षात, भारताच्या संरक्षण निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत ५४ टक्क्यांनी वाढ झाली असून ती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचली आहे. हा उच्चांक १३ हजार कोटी रुपयांच्या पातळीवर गेला.
संरक्षण उत्पादन विभागाचे अतिरिक्त सचिव संजय जाजू यांनी सांगितले की, देशाची संरक्षण निर्यात प्रामुख्याने अमेरिका, फिलिपाईन, आग्नेय आशिया, मध्य पूर्व आणि आफ्रिका या देशांना होते. भारताची संरक्षण निर्यात २०२०-२१ मध्ये ८ हजार ४३४ कोटी रूपये तर, २०१९-२० मध्ये ९ हजार ११५ कोटी रुपये होती. कोरोनामुळे दोन वर्षे मंदी होती, पण यावेळी आम्ही चांगली प्रगती केली आहे.” असे संजय जाजू म्हणाले, खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी जवळपास ९० टक्के निर्यात करून चांगली कामगिरी केली आहे.
अमेरिका, फिलिपिन्ससह इतर देशांना भारताने संरक्षण क्षेत्राशी संबंधित वेगवेगळ्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली. वाजवी दर आणि उत्तम दर्जा या दोन कारणांमुळे भारताच्या संरक्षण उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारात असलेली मागणी वाढू लागली आहे. पुढील काही वर्षांत संरक्षण क्षेत्रातील निर्यात नवनवे उच्चांक गाठेल, असा विश्वास अतिरिक्त संरक्षण उत्पादन सचिव संजय जाजू यांनी व्यक्त केला.